भ्रष्टाचाराचा वास; विटावा कोळीवाड्यातील नागरिकांचा आरोप
ठाणे: विटावा कोळीवाडा परिसरात वापरात नसलेल्या आणि पडझड झालेल्या शौचालयाच्या जागी गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका किंवा आरोग्य केंद्राचा प्रस्ताव असताना त्या ठिकाणी आता पुन्हा शौचालयाचे बांधकाम सुरू झाले आहे. अनावश्यक कामातून ठाणे महापालिकेच्या पर्यायाने ठाणेकरांच्या पैशांची उधळपट्टी होत असून भ्रष्टाचाराचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
कळवा प्रभाग समिती अंतर्गत विटावा कोळीवाडा येथे ठाणे महापालिकेचे दुमजली शौचालय गेली अनेक वर्षे विना वापर पडून होते, त्यामुळे त्याची पडझडही झाली होती. विशेष म्हणजे या जागेचा वापर समाज कंटक आणि गर्दुल्ले करत होते. त्यामुळे स्थानिकांना विशेषतः महिलांना येथून ये-जा करणे अशक्य झाले होते. या शौचालयाची गरज नसल्याने या जागी येथील गरीब-गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका किंवा आरोग्य केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर उपाध्यक्ष अंकुश मढवी यांनी गेल्या वर्षी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती.
विशेष म्हणजे हे शौचालय तोडून त्या जागी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका किंवा आरोग्य केंद्र उभारण्याबाबत प्रस्ताव महासभेत २१ डिसेंबर २०१९ रोजी दाखल करण्यात आला होता. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला होता. या ठरावाची प्रत आणि शौचालयाची गरज नसल्याची बाब श्री.मढवी यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली होती. याबाबत स्थळ पाहणी करून हे शौचालय गेल्या १२ वर्षांपासून बंद आणि धोकादायक अवस्थेत असल्याचा अहवाल मुख्य स्वच्छता निरीक्षकांनी प्रशासनास सादर केला होता. तसेच या विभागातील रहिवाशांना शौचालयाची गरज नसल्याचे देखील त्यांनी १८ ऑगस्ट २०२३ रोजी अहवालाद्वारे कळवले होते. तत्कालीन सहायक आयुक्त यांनी देखील सकारात्मक मत व्यक्त केले होते.
सध्या या ठिकाणी जुने बांधकाम तोडून तेथे नव्याने शौचालय उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या भागात पऱ्याचे मैदान, जकात नाका आदी तीन-चार ठिकाणी शौचालय आहे. विटावा कोळीवाडा भागात आवश्यकता नसताना आणि अभ्यासिका/आरोग्य केंद्राचा प्रस्ताव असताना पुन्हा शौचालयाचे बांधकाम सुरू झाल्याने रहिवासी संतापले आहेत. यामुळे नाहक महापालिकेच्या पर्यायाने ठाणेकरांच्या पैशांची उधळपट्टी होत असून यात भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.
नवीन शौचालयाचे बांधकाम तत्काळ बंद करण्यात येऊन जुन्या प्रस्तावाप्रमाणे आणि नागरिकांच्या मागणीनुसार अभ्यासिका किंवा आरोग्य केंद्र उभारण्यात यावे. अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा श्री.मढवी यांनी दिला आहे.