कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प अंतिम टप्प्यात !

ठाण्याचा कचरा आता थेट भंडार्लीला

ठाणे : कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा ठाणे महापालिकेचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून दोन ते तीन महिन्यांत पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले जाणार आहे.

महापालिकेच्या हद्दीत दरदिवशी सुमारे एक हजार टन कचऱ्याची निर्मिती होते. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेच्या मालकीचे डम्पिंग ग्राउंड नाही, त्यामुळे मागील अनेक वर्षे दिवा येथील खाडीकिनारी खासगी जमिनीवर ठाण्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावली जात होती. त्याचा त्रास दिवेकरांना होत होता, त्यामुळे राज्य सरकारकडे ठामपाने भूखंडाची मागणी केल्यानंतर डायघर येथे महापालिकेला नऊ हेक्टर एवढा भूखंड मिळाला होता. या भूखंडावर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार होती. मागील सुमारे १५ वर्ष हा प्रकल्प धीम्या गतीने सुरू होता तर दुसऱ्या बाजूला दिव्याच्या डम्पिंग ग्राउंडला दिवेकरांचा विरोध वाढला होता, त्यामुळे महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भंडार्ली येथील खाजगी भूखंड भाडेतत्त्वावर घेतला. तेथे उद्यापासून कचरा टाकला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी जाहीर केले. त्याचबरोबर डायघर येथील कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प देखील अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या दोन ते तीन महिन्यांत पहिला टप्पा कार्यान्वित होणार असून त्यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे, तर सुक्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाणार असल्याचे आयुक्त श्री. बांगर म्हणाले. दुसऱ्या टप्प्यात कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ही कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. या वीजेचा वापर महापालिकेच्या विविध ठिकाणी वापर केला जाणार असल्याचे आयुक्त बांगर म्हणाले.