राजकीय पक्ष आणि बीएलओ होणार मतदार याद्यांचे वाहक

राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ठाणे : पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, नवीन मतदार नोंदणीसाठी तसेच प्रारुप व अंतिम मतदार यादीची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमावेत. तसेच मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येईल, हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने १ जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) जाहीर केला आहे. त्याची माहिती देण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार प्रदीप कुडळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. शिनगारे यांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देऊन म्हणाले की, मतदारांपर्यंत मतदार यादीची माहिती पोहचविण्यासाठी राजकीय पक्षाची मोठी मदत होणार आहे. निवडणूक प्रशासनाकडून केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) नेमण्यात आले आहेत. येत्या 25 जुलै 2024 रोजी एकत्रित प्रारुप यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यावेळी बीएलओंबरोबर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी समन्वय साधून नवीन मतदार नोंदणी करणे, मतदारांचे नाव यादीत आहे का तपासणे, यादी नाव नसेल अथवा त्यामध्ये दुरुस्ती असेल तर त्यासाठी मतदारांकडून अर्ज भरून घेणे ही कामे करावीत. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नवीन मतदान केंद्रे उभारणे व सध्याच्या मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरणासाठीही राजकीय पक्षांनी सहकार्य करावे.

मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मतदान यादीत नाव असेल तरच नागरिकांना मतदान करता येणार आहे. निवडणूक ओळखपत्र असेल आणि यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होताच त्यामध्ये आपले नाव आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. नाव नसेल तर किंवा त्यामध्ये दुरुस्ती असेल तर तातडीने अर्ज करून नाव नोंदणी/दुरुस्ती करावी, यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही श्री. शिनगारे यांनी यावेळी केले.