उमेदवार जेव्हा येईल घरा: विकासाबाबत त्याला विचारा !

विकासाच्या मुद्याला प्राधान्य देऊन निवडून येणे केव्हाही चांगले. प्रगल्भ लोकशाहीचे खरे तर हे लक्षण. ते अधिक स्पष्ट झाले ते 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत. भाजपा-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदारांनी कौल दिला आणि भारतीय समाजमनाला निवडणुकीचे राजकारण अखेर जातपात आणि धर्मावर आधारित मतपेढीच्या बंधनातून मुक्त झाले असे वाटले. 2019 मध्ये काही प्रमाणात विकासाच्या मुद्याचे गारुड राहीले, परंतु 2024 मध्ये ते पूर्णपणे लयास गेलेले दिसले. भारतीय निवडणुका पुन्हा जुन्याच तीन ‘एम’ वर बेतली गेली. (मसल-शक्ती, मनी-पैसे, मशिनरी-सरकारी संसाधने) यांचा सर्रास वापर तर झालाच परंतु जात आणि धर्म यांचा पद्धतशीरपणे वापर करुन ध्रुवीकरण घडवले गेले. विकासाचा मुद्दा अडगळीत गेला. तो कोणामुळे गेला याचे खापर सत्तारूढ पक्ष विरोधकांवर फोडेल तर विरोधकांच्या मते सत्तारुढ पक्षाने सत्तेचा गैरवापर केल्यामुळेच मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असा बचावात्मक पवित्रा घेतला. ते काही असले तरी विकास राजकीय रडारवरुन गायब झाला हे मान्य करावे लागेल.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची लगबग सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष विकास सोडून सर्व अनावश्यक आणि अनाठायी मुद्यांवर चर्चा घडवून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कोणत्या जातीचा उमेदवार कुठे ‘चालेल,’ कोणाकडे मतदान विकत घेण्याची आर्थिक ताकद आहे. कोणाला तिकिट दिले तर पुढचे राजकारण सुलभ होईल किंवा कोणाचे कापले तर सत्तेचा मार्ग मोकळा होईल, अशा विचाराने पछाडलेले पक्षश्रेष्ठी विकासाबाबत खचितच बोलताना दिसत नाहीत. ‘इलेक्टीव्ह मेरीट’ मध्ये उमेदवाराचे विकासाबाबतचे आकलन आणि अभ्यास तसेच अंमलबजावणीबाबतचा कार्यक्रम काय आहे, हे प्रश्न मुलाखतीत विचारले जात नाहीत. त्यावरून महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाबाबत शंका घ्यावी इतकी वाईट अवस्था सर्वच पक्षांनी केली आहे.
या ठिकाणी एक उदाहरण आवर्जून द्यावेसे वाटते. सुमारे वर्ष-दीड वर्षापूर्वी ठाणेवैभव आणि वाविकर नेत्र रुग्णालय यांच्यातर्फे ठाणे-व्हिजन 2030 असा उपक्रम राबवण्यात आला. सुमारे 40 शाळांतील मुलांनी दोनशे मॉडेल्स आणि 1500 चित्रे काढून 2030 चे ठाणे कसे असावे याचे कल्पनाचित्र सादर केले. या उपक्रमात आम्ही पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या ज्येष्ठ आजी-माजी अधिकाऱ्यांची व्याख्याने ठेवली. मुलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. पण ठाण्याच्या नेत्यांना ठाकरे स्मारकात झालेल्या शहरहिताच्या या प्रकल्पास भेट द्यावीशी वाटली नाही! याचा अर्थ विकास हा तोंडी लावण्याचा पदार्थ असून त्यावर चर्चा करणे अथवा जनतेचे ऐकणे हे वेळ वाया घालवण्यासारखे ठरते हा अनुमान बांधला असावा. आता एका राजकीय पक्षाच्या युवा संघटनेने तरुणाईला विकासाचे व्हिजन काय असावे, हे आवाहन केले आहे. त्याचे टाईमिंग आणि निवडणुका यांचा परस्परांशी संबंध असेल तर तो योगायोग नक्कीच मानता येणार नाही. परंतु या युवा संघटनेला ‘ठाणेवैभव’च्या उपक्रमाची माहिती तरी होती काय हा खरा प्रश्न आहे.
विकासाच्या मुद्यावरुन सुरु झालेले निवडणुकीच्या विषयातील स्वारस्य अवघ्या 15 वर्षांत संपत असेल तर आपल्या उमेदवारांकडून आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षा ठेवणे अशक्य आहे. आमची मतदारांना विनंती आहे की दारी येणाऱ्या उमेदवाराला विकास, नियोजन, अंमलबजावणी, या जीवनाशी थेट संबंध असणाऱ्या मुद्यांवर प्रश्न विचारा. तो जी उत्तरे देईल त्यावरुन तुमचे मत कोणाला द्यायचे हे ठरवा. भले मग तो माझ्या पसंतीच्या पक्षाचा उमेदवार नसला तरी!