पॉलिटिकली क्वारंटाईन व्हा !

कोणताही आजार नियंत्रणात आणायचा असेल तर औषधोपचार सुरु करण्यापूर्वी काही पथ्य पाळून शारीरिक चलनवलन पूर्वपदावर आणणे शहाणपणाचे मानले जाते. साधा ताप, खोकला, पोट बिघडणे वगैरे दीर्घकालीन आजार या सदरात मोडत नसतात. कुपथ्य झाल्यावर शरीराची ती स्वाभाविक प्रतिक्रिया असते. अशावेळी तुमची प्रतिकारशक्ती वाढवणे हेच इष्ट असते.
त्याकरिता पथ्य पाळण्यासारखा पर्याय नाही. निसर्गाचा हा नियम मात्र सामाजिक जीवनात पायदळी तुडवला जातो. ही बाब प्रकर्षाने दिसते ती राजकीय क्षेत्रात. या क्षेत्रात वावरणार्‍या मंडळींनी सर्व मर्यादा उल्लंघून पराकोटीचे कुपथ्य केले असल्यामुळे निवडणुका संपल्या, निकाल लागले, सरकार स्थापन झाले तरी अनेकांना करपट ढेकर येत आहेत. याचे कारण त्यांचा जिभेवरील सुटलेला ताबा. सकाळ-संध्याकाळ, जाहीरपणे शिव्या घालणारे रात्रीच्या अंधारात एकांतात कट-कारस्थाने आखत असतात आणि त्यामुळे स्वतःबरोबर त्यानी समाजाचेही आरोग्य पार बिघडवून टाकले. माध्यमे अशा अनेक मंडळींना (लायकी नसताना) अवास्तव प्रसिद्धी देऊन स्वत:ची पोळी भाजत असी तरी वाचक-दर्शक यांना अकारण फिजुल गोष्टींमध्ये गुंतवून ठेवत आहे. जे मानसिक स्वास्थ्यला घातक ठरले. राजकरणाचा उबग येणे आणि राजकारण्यांबद्दल तिटकरा वाटण्यामागे राजकरणाचा अतिरेक हे कारण आहे हे सांगायला राजकीय निरीक्षकाची गरज नाही.
लोकसभा निवडणुकीचे सूप वाजताच विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभानिहाय मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाल्यामुळे विधानसभेत महायुतीला सत्ता राखणे कठीण होईल असा निष्कर्ष काढून एका चॅनलने नेत्यांमध्ये जुंपवली, दुसऱ्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांची बातमी दिवसभर ’चालवून’ वातावरण तापवले. पदवधीर मतदार संघाच्या निवडणुकांत कोण कोणासाठी माघार घेतोय किंवा कोणी केवळ माघारीचे ‘नाटक’ करुन अपक्ष उमेदवाराला रसद पुरवत आहे, असा वाद निर्माण करुन माध्यमांचा प्रकाशझोत राजकारणापासून हटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीमुळे छगन भुजबळ यांना आलेला राग (?), रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांना मारलेले टोमणे, मोठा भाऊ-छोटा भाऊ ही नेहमीची रेकॉर्ड काही जननी वाजवायला घेतली आणि नेहमीचे यशस्वी वाचाळवीर सकाळच्या सूर्योदयालाही लाजवतील या सातत्याने तोंडात ब्रश धरण्याऐवजी चक्क वाहिनीचा माईक तोंडात ठेऊन दिवसभर लागणारा दारूगोळा पुरवत राहिले! अशा घटनांचा रतिब जनतेला न विचारता घातला जात आहे. या न संपणाऱ्या राजकीय बातम्यांची मुळात गरज आहे काय, त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होत असतो. उदाहरणार्थ सुप्रिया सुळे निवडून आल्यावर अजित पवारांच्या आईला भेटीला जात असतील तर तो त्यांचा खाजगी विषय बनतो. त्याबद्दल माध्यमे आणि त्यांच्या सापळ्यात अडकलेल्या जनतेने नाक खुपण्याची गरज आहे का? प्रतापराव जाधव यांना कॅबिनेटमंत्रीपद मिळाले असते तर तुमच्या-आमच्या आयुष्यात काय फरक पडला असता? कांदा स्वस्त करण्याची तर कोणी बातही करीत नाही. धरणांमध्ये पाणीसाठा नाही हे तर अनेकांच्या गावीही नाही. यावरून राजकीय कावीळ किती बळावली आहे याची खात्री पटते.
महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यापासून सुरु असलेला राजकीय अतिसार थांबता थांबत नाही. राजकारणामुळे नेत्यांची विश्‍वासार्हता तर रसातळाला गेलीच, पण नवरा-बायको, भाऊ-भाऊ, नणंद-भावजया, बाप-लेक, सुन-सासरे, जावई-सासू, मित्र-मित्र सारेच एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. महाराष्ट्रातील राजकारण संशयात अडकले आणि त्याने संपूर्ण राज्याला आपल्या कवेत घेतले.
कोव्हिड काळात स्वच्छतेचे जसे नियम पाळले जात तसे या राजकीय-कोरोना पर्वात पुन्हा आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ नेत्यांनी प्रत्येक शब्द जंतूनाशकातून बुडवून काढायला हवा, मग तो जिभेवर ठेवायला हवा, भाज्या आणि फळे याप्रमाणे प्रत्येक आरोप पाण्यातून बुचकळून काढायला हवेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्छ कारभार करण्यासाठी सर्वप्रथम हात स्वच्छ धुवायला हवेत. जमल्यास कपाटातून मुखपट्टी काढून तिचा वापर केला पाहिजे म्हणजे निदान समाजावर त्यांच्या आचरट आणि अश्‍लाघ्य शिव्या ऐकण्याची तरी नौबत येणार नाही.
महाराष्ट्राच्या आणि व्यक्तीगत जनतेच्या निरोगी प्रकृतीसाठी समस्त मंडळींनी (यात नेते, माध्यमे आणि पर्यायाने जनता आली) राजकारणापासून विलगीकरण करायला हवे. हा स्वस्त सोपा उपाय मानसिक शांतता साधू शकेल आणि भले देशाचा विकास झाला नाही तरी स्वतःच्या आत्मिक विकासाकरिता उपयुक्त ठरू शकेल. ज्यांना विलगीकरण समजले नसेल त्यांच्यासाठी आम्ही सोप्या मराठीत एवढेच म्हणू, ‘पॉलिटिकल क्वारांटाईन’ व्हा! गलिच्छ राजकारण रोखणारी लस बाजारात कधीच येणार नाही कारण राजकारणावर जगणाऱ्या विषाणूंचे नव-नवे अवतार, नव-नव्या पक्षांत, खांद्यावर नव-नवीन झेंडे घेऊन युत्या-आघाड्या करीत तुम्हाला त्रास देत रहातील. राजकारणाला मन-आणि मेंदूत प्रवेशबंदी (अर्थात नो-एंट्रीचा) बोर्ड लावून पूर्वीसारखे शांत, संयमी आणि सुखाचे जीवन जगा. क्वारंटाइन व्हा!!