कळस आपल्या हाती !

राम मंदिराचे उद्घाटन आणि पाठोपाठ ज्ञानव्यापी मंदिरात पुजेला मिळालेली परवानगी, यांमुळे संपूर्ण देशात श्रद्धा, धर्म आणि अध्यात्माची लाट उसळली आहे. हिंदू-बहुल देशात असे होणे स्वाभाविक होते. त्यामागचे राजकीय रंग बाजूला ठेवले तरी जो उत्साह आणि आनंद उसळला आहे तो व्यक्तीगत स्वरुपाचा आहे हे मान्य करावे लागेल. याचा अर्थ सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे उच्चाटन झाले असे म्हणणे पूर्वग्रहदूषितपणाचे लक्षण समजायला हवे. रामाबद्दल असलेली निस्सीम श्रद्धा आणि त्याभोवती असलेले अस्मितेचे वलय यांमुळे उत्सव तर होणार होताच आणि तसा तो झालाही. देशांत ज्ञानव्यापीसारखी शेकडो मंदीरे इतिहासातील घटनांमुळे जमिनीखाली गाडली गेली असतील. त्या सर्वांसाठी लढा देणे शक्य नाही. अयोध्येतील राममंदिर हे त्याचे प्रातिनिधीक स्वरुप होते आणि त्यातून आवश्यक ती प्रेरणा घेऊन पुढचे मार्गक्रमण व्हायला हवे. कोणत्या देवाची पूजा करावी किंवा मुळात ती करावीच का, असे प्रश्न पडणारे समाजात खूप असतील. तो त्यांच्या व्यक्तीगत विवेकाचा आणि आस्थेचा विषय आहे. घटनेने त्या अधिकाराला संरक्षणही दिले आहे. परंतु केवळ पुजा-अर्चा करुन भागणार आहे काय? देशाला पुढे नेण्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद जरूर हवेत, परंतु त्यासाठी प्रयत्नांची पूजा करणे तर सर्वस्वी जनतेच्या हाती आहे ना!
देवावर विश्वास असणे वा नसणे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे, हे मान्य केले तर मग देवभक्तीला सकारात्मक कृतीची जोड देण्यासाठी, विशेषतः तरुणाईने आपले काम ही पूजा मानायला हवी. कर्तव्याचे पालन हाही पूजेचा प्रकार असतो आणि नैतिकतेचे वर्तन हीच खरी अध्यात्माची व्याख्या व्हायला हवी. पूजा-अर्चा करणारे या कर्तव्यांत चुकत असतील तर ते एका प्रकारे स्वत:ची आणि देवाची फसवणूक करीत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील प्रत्येक नागरीक हा कर्तव्यांचा पुजारी व्हावा असे वाटत असावे. त्याची ग्वाही ते युवकांशी संवाद साधतात तेव्हा प्रकर्षाने जाणवते. देवाचे महत्व त्यामुळे कमी होत नसते तर देवाच्या डोळ्यात डोळे घालून पहाण्याची हिंमत वाढत असते. ही हिंमत कर्तव्यपूर्तीच्या अधिष्ठानावर बेतलेली असते.
श्रध्दा आणि अंधश्रध्दा यांमध्ये दुसऱ्या पर्यायाचा कोणीच पुरस्कार करीत नसतो. नेमून दिलेले काम विहीत वेळेत पूर्ण न करणे आणि तरीही उपासतापास करणे हा देवाला प्रसन्न करण्याचा अंधश्रद्धेचा मार्ग आहे. काम वेळेत करून देवासमोर आत्मविश्वासाने उभे राहणाऱ्याचे देवालाही खचितच कौतुक वाटत असते. कर बुडवून, बेईमानी करुन, पैसा कमवणारे देवळात उजळ माथ्याने जाऊच कसे शकतात असा प्रश्न देवाकडे डोळसपणे पहाणारा ‘रॅशनल’ भक्तांचा एक मोठा वर्ग आहे हे विसरता कामा नये. तेही रामाचेच भक्त आहेत. पण त्यांना रामाच्या नावाखाली होणारी अनागोंदी मान्य नाही. खोटेपणा आणि अनैतिकता यापासून स्वत:ला दूर ठेवणारे सच्चे भक्त ठरतील. अशा सच्च्या भक्तांमुळेच देश नामक मंदीरावर कळस चढू शकेल. देव आणि देश ही चर्चा सुरु आहे आणि त्याचा अन्वयार्थ भक्तीचा मार्ग कर्माच्या मार्गाने जाणे असाच होतो. धर्माला त्याचे मोठेपण तो पाळणारे सचोटीने आणि ध्येयाने प्रेरित माणसेच देऊ शकतात. प्रत्येक आघाडीवर आणि प्रत्येक क्षेत्रातील भारतीयांनी देशाचा कळस मीच चढवणार ही ऊर्जा घ्यायला हवी. सकाळी जोडले जाणारे हात दिवसभर रचनात्मक कार्यात गुंतले तरच पूजा फलदायी ठरू शकते. थोडक्यात कर्तव्यात राम आहे अशी खूणगाठ प्रत्येकाने मनाशी करुन देश-उभारणीच्या पुजेला लागायला हवे. आपल्याला आता पाच ट्रिलियनचा घंटानाद करायचा आहे. आता तर कुठे सुरुवात झाली आहे, काम तर खूप बाकी आहे. पाठीशी असला राम तर फत्ते होईल हेही काम!