ठाण्याचा शिल्पकार

ज्या काळात शहरांचे वर्णन करताना स्मार्ट या शब्दाचे बिरूद लावण्याची प्रथा नव्हती, त्या जमान्यात ठाणे शहर ‘स्मार्ट’ करण्याची पहिली पावले उचलली गेली. त्याचे श्रेय निर्विवादपणे ठाण्याचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांना द्यावे लागेल. त्यांच्या निधनामुळे तलावाच्या या शहराचा शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला असे म्हणावे लागेल. महापौर होण्यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव क्रीडागृह, मारोतराव शिंदे तरण तलाव अशा विविध वास्तूंची निर्मिती केली आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या शहराला आधुनिक काळाची ओळख करून दिली. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते राज्यसभा सदस्य अशी जवळजवळ पाच दशकांची कारकीर्द व्हाया नगराध्यक्ष आणि महापौर पदातून पुढे गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठाणे शहरावर विशेष प्रेम होतेच आणि श्री. सतीश प्रधान हे त्यांचे लाडके तरुण नेते होते. त्यामुळे 12 जणांच्या प्रधानमंडळात श्री. सतीश प्रधान नसते तरच नवल! ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुखांच्या विचाराचे अनुकरण श्री. प्रधान करीत होते आणि त्या अर्थी राजकीय नेतृत्व आणि समाज यांची जवळीक स्थापन झाली होती. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होण्याचे प्रमुख कारण श्री. प्रधान यांनी पालिकेतर्फे जनतेच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्याबाबत केलेले काम आणि पालिकेबाहेर जनतेशी नाळ जुळवून ठेवण्याबाबत कै.आनंद दिघे यांचे विलक्षण योगदान या दोन सेना नेत्यांमुळे आजही ठाण्यावर भगव्याची गडद छाया आहे.
श्री. सतीश प्रधान यांचे राजकारण जवळून पाहण्याचा योग आम्हाला आला. ‘ठाणेवैभव’चे संपादक-संस्थापक कै.नरेंद्र बल्लाळ यांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या काळात श्री. प्रधान उथळसर भागात राहायचे आणि बल्लाळ परिवार जवळच असलेल्या श्रीरंग सहनिवासात. त्यामुळे आम्ही विद्यार्थी दशेत असल्यापासून त्यांना पहात आलो होतो. बाळासाहेबांच्या विचारांनी भारावलेली शिवसैनिकाची एक विशेष अशी प्रतिमा काय असते त्याचे दर्शन आम्हाला तेव्हा नित्य होत होते. त्यामुळे शहराचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवले जाणार याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती. ठाणे शहराचा आवाका त्या काळात छोटा होता. गावकीची जिव्हाळ्याची नाती शहरीकरणाच्या प्रक्रियेत पुसली जात नव्हती. किंबहुना क्रीडागृह असो की नाट्यगृह, यामुळे ठाण्याला स्वतंत्र ओळख निर्माण होऊ लागली आणि या दोन मानबिंदुंमुळे ठाणेकरांचा परस्परांशी असलेला दुवा बळकट होत गेला. कालांतराने शहरीकरणाची मोठी लाट धडका मारू लागली होती. आसपासची गावे त्यांच्या ग्रामपंचायतीसह ठाणे महापालिकेत विलीन होऊ लागली. औद्योगिक कारखान्याचे मोठे भू-पट्टे निवासी संकुलांसाठी उपलब्ध झाले. ठाण्याने खऱ्या अर्थाने कूस बदलली होती आणि श्री. प्रधान यांचे नेतृत्वही आता शहराची वेस सोडून दिल्लीत राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली होती. राज्यसभेत त्यांनी शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवत ठेवला. सीमा भागातील आंदोलनात सहभागी झालेल्या प्रधानांवर काश्मीरमध्ये शिवसेना वाढवण्याची जबाबदारी त्या काळात सोपवण्यात आली होती.
ठाण्यात मॅरेथॉन स्पर्धेचे बीज पेरणाऱ्या सतीश प्रधान यांचे क्रीडा क्षेत्रावर प्रेम होते. ही स्पर्धा ठाण्याची ओळख झाली. त्याच काळात साधारणत: 1976 मध्ये ज्ञानसाधना महाविद्यालय स्थापन करून त्यांनी वंचित मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची सोय केली. ज्ञानसाधना महाविद्यालयाचा आजचा विस्तार श्री. सतीश प्रधान यांच्या प्रेरणेचा आविष्कार आहे. विशेष म्हणजे शिक्षणाची ही परंपरा अखंडीत राहावी यासाठी त्यांचे चिरंजीव कमलेश आणि स्नुषा सौ. मानसी परिश्रम घेत आहेत. ही संस्था त्यांचे चिरंतन स्मरण करीत राहणार आहे आणि सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनात श्री. प्रधान यांच्या कर्तृत्वाला सदैव उजाळा देत राहणार आहे.
‘ठाणेवैभव’ परिवारातर्फे एका लोकोपयोगी नेतृत्वाला आमचा मानाचा मुजरा.