मतदारांची पहिली पसंत

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे मनसुबे खरे झाले, त्यांचे सर्व नऊ आमदार निवडून आले. महाआघाडीने एक जादा उमेदवार रिंगणात उभा केला होता. असा ‘चान्स’ राजकीय पक्ष घेत असतात. तसा घेतला गेला. परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे महायुतीची सरशी आणि महाविकास आघाडीला धक्का अशी बातमी माध्यमांना मिळाली. अलिकडच्या लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसाठी हे यश आश्‍वस्त करणारे आहे. महायुतीच्या काही अतीउत्साही नेत्यांनी या यशावर विधानसभेतील यशाचे भाकितही केले आहे. परंतु सर्वसामान्य मतदारांना सामोरे जाताना पहिल्या पसंतीची हमी मिळवावी लागते. दुसर्‍या पसंतीची तिथे मुभा नसते. त्यामुळे पहिली पसंती कशी पूर्ववत मिळवता येईल याचा विचार महायुतीला करावा लागेल.
लोकसभा निवडणुकीतील यशामुळे काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. परंंतु विधान परिषदेसाठी झालेले मतदान पहाता, काँग्रेसचे सात आमदार फुटले असावेत असे बोलले जात आहे. ते खरे असेल कारण अन्य पक्षांना मिळालेल्या मतांचा त्यांच्याकडे असलेल्या मतांशी ताळमेळ बसत आहे. काँग्रेसमध्येच काहीतरी गडबड झाली या निष्कर्षाला राजकीय विशेषज्ञ आले आहेत. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची मोर्चेबांधणी करु लागलेल्या महाआघाडीसाठी ही घटना अपायकारक ठरते. या निवडणुकीत थेट जनतेशी संबंध येत नसला तरी ज्या विधानसभेतील आमदारांना लोकांनी निवडून दिले आहे त्यांचे वर्तन जनतेच्या नजरेतून कमीपणा आणणारे आहे. या निवडणुकीत झालेले मतदान दोन गोष्टी प्रामुख्याने सिद्ध करतात. युती आणि आघाडीतील मतदारांचा एकमेकांवर विश्वास नाही. पक्षाने दिलेला आदेश पाळण्याची त्यांची मन:स्थिती नाही, अन्यथा मतदान ठरल्याप्रमाणे झाले असते आणि गणित चुकलेही नसते. स्वत:पलिकडे पक्षाचे आणि पर्यायाने जनतेचे व्यापक हीत कशात आहे हा दृष्टीकोन आमदारांमध्ये नसल्याचे ही निवडणुक दाखवून देते. या निवडणुकीत घोडेबाजार झाल्यााचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ही बाब तर महाराष्ट्रातील जनतेच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळे तिला धक्का बसणार नाही. मुळात राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना घोडेबाजार वगैरे बाबींवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे काय, हा प्रश्नही पडतो.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर विधान परिषदेच्या निवडणुकीचा परिणाम वरील काही कारणांमुळे होऊ शकतो. राजकीय पक्षांकडे बघण्याचा दृष्टीकोन बिघडला आहे हे लोकसभा निवडणूक निकालांनी दाखवून दिले आहे. संताप आणि वैषम्य यांच्या समान मात्रेमुळे महायुतीला फटका बसला. या दोन्ही प्रतिक्रिया कमी होण्यासाठी राजकारण्यांनी महाराष्ट्रातून हद्दपार झालेली नैतिकता परत आणावी ही अपेक्षा आहे. राजकारण शुद्ध आणि प्रामाणिक असावे असा भुळचट आणि मूर्ख विचार कोणीच करीत नसते. परंतु किमान पक्ष अधूनमधून त्याची झलक दिसली तर पक्षांबद्दल उरलीसुरली आपुलकी राहू शकेल. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर जिंकणाऱ्यांनी दाखवलेला उन्माद आणि हरणाऱ्यांनी व्यक्त केलेला राग पहाता राजकीय पक्षांचे वागणे लोकसभा निवडणुकीत जे होते ते मागील पानावरून पुढे सुरु आहे असेच म्हणावे लागेल!
सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाला पहिली पसंती मिळावी असे जर वाटत असेल तर पहिल्या श्रेणीचे वर्तन आणि कार्य इच्छुक उमेदवारांना आणि त्यांच्या नेत्यांना करुन दाखवावे लागेल. काँग्रेसला ‘त्या’ सात फितुरांचा शोध घ्यावाच लागेल.