ये जो पब्लिक है वो सब जानती है….. असे शब्द असलेले रोटी (१९७४) चित्रपटातले गाणे खूप गाजले होते. ५० वर्षांपूर्वीचे हे गाणे आजही तितकेच वास्तववादी त्याची प्रचिती अधून-मधून सर्वच नेत्यांना येत असते. तशी ती ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांना आली आहे. दिल्लीच्या निवडणुकीत सत्ता गमावल्यामुळे त्यांच्याबद्दल पब्लिकला बरेच काही माहीत होते, पण खुद्द केजरीवाल मात्र जनता अनभिज्ञ आहे अशा गोड गैरसमजुतीत होते, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. तब्बल२७ वर्षांनी भाजपाला सत्ता खेचून आणण्यात यश आले आहे. त्यामागे त्यांचे नियोजन आणि अँटी इन्कम्बन्सी ही दोन कारणे असली तरी ‘आप’चा तथाकथित नैतिकतेचा फुगा फुटला होता हेच खरे. कारभारावर जनता नाराज होत चालली होती हे अधिक खरे कारण ठरले. सातत्याने जनतेचा कौल मिळवणाऱ्या केजरीवाल यांची जादू ओसरु लागली होती आणि अखेर जादूची कांडी निष्प्रभ ठरली स्वच्छतेची ग्वाही देणारा झाडू कुचकामी ठरला!
या विजयामुळे भाजपामध्ये जल्लोष होत आहे. परंतु या निकालावर उमटलेल्या दोन प्रतिक्रियांनी भाजपाच्या नेत्यांनाही मागे टाकले. आपच्या संस्थापकांपैकी एक कुमार विश्वास हे तसे पाहिले गेले तर आपल्या वाणीने आणि अर्थपूर्ण निरूपणातून जनतेची मने जिंकत आले आहेत. त्यांचा तोल सहसा ढासळत नाही आणि जिभेवर तर सरस्वतीची कृपा असल्यामुळे ती घसरण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु केजरीवाल हे किती हीन विचारांचे आत्मकेंद्री आणि अहंकारी आहेत असे सांगून त्यांनी ‘आप’ला मतदारांनी केलेल्या शिक्षेबद्दल अभिनंदन केले! दुसरीकडे ज्या लोकपाल आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून केजरीवाल यांच्या नेतृत्वाचा जन्म झाला, त्या आंदोलनाचे जनक अण्णा हजारे यांनीही केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली. यामुळे ‘आप’बरोबर केजरीवाल यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. त्यांच्या पराभवास ते स्वतः जबाबदार असून भाजपाचे नियोजन हे निमित्त ठरले असेच म्हणावे लागेल.
केजरीवाल यांचे अनेक विश्वासू सहकारी त्यांना सोडून गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्री सर्रास भ्रष्टाचार करून लागले. खुद्द केजरीवाल यांनी स्वतःची प्रतिमा वादग्रस्त बनवली. भ्रष्ट आणि अकार्यक्षम मंत्र्यांना पाठीशी घालताना, घराणेशाहीला प्रोत्साहन देताना आणि एकीकडे घरात भांडणे सुरू असताना राष्ट्रीय क्षितिजावर स्वतःला पंतप्रधान म्हणून पाहण्याची त्यांनी चूक केली. त्यांची महत्त्वाकांक्षा ते लपवू शकले नाहीत. गोवा-पंजाब यांसारख्या राज्यात त्यांनी विस्तार करण्याचा प्रयत्नही केला. परंतु त्याचवेळी ‘आप’च्या तिकिटावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी बेफाम वागू लागले. दारूचा ठेका आणि परवाने देण्याचे प्रकरण उघडकीस आले आणि ‘आप’ही सर्वसामान्य पक्षासारखाच आहे हा निष्कर्ष जनतेने काढला. राजकारणात सत्ता आली की मोहाचे क्षण आपोआप मागून चालत येतात. श्री. केजरीवाल यांच्या तथाकथित नैतिक राजकारणाचा या क्षणांनी बळी घेतला होता. ‘आप’ची लफडी जनतेला समजू लागली आणि त्यांच्या विरुद्ध नाराजी वाढली. भाजपा याच क्षणाची वाट पाहत होता. केजरीवाल यांच्यासाठी त्यांना सापळा रचावा लागला नाही, ते स्वतःच त्यात येऊन अडकले.
असो, नैतिकतेच्या जोरावर दोनदा सत्ता मिळवणाऱ्या केजरीवाल यांच्याबद्दल मतदारांना विशेषतः सुशिक्षित आणि मध्यमवर्गीयांना भूरळ पडली तशी देशात अन्यत्र कुठे पडलेली नाही. केजरीवाल यांच्याकडे आशेने पाहिले जात असताना दिल्लीच्या पराभवामुळे हा दृष्टिकोन बदलणार आहे. अण्णांच्या आंदोलनापासून ते लोकपाल नियुक्ती आणि माहितीचा अधिकार अशी सर्व शुद्धीकरणाची प्रक्रिया या पराभवामुळे थांबणार आहे, गढूळ होणार आहे. ही बाब अधिक घातक असून त्याचे पडसाद नागरी चळवळींवर होणार आहे. पब्लिकचा मुळातच राजकारणावर विश्वास नाही आणि केजरीवाल यांच्या कर्तृत्वाने (?) त्यांच्या उरल्या-सुरल्या विश्वासालाही तडा गेला आहे. या निवडणुकीत भाजपा जरूर जिंकली आहे, परंतु आदर्श नेत्याच्या शोधात असलेली जनता पराभूत झाली आहे. ‘आप’चा प्रयोग फसला असेल तर जनतेने काही वर्षांपूर्वी मिळालेला आवाजही गमावला आहे, असेच म्हणावे लागेल. यातून विद्यमान नेत्यांनी एकच धडा घ्यायला हवा. तुम्ही कसे वागता, किती श्रीमंत होता आणि नैतिकतेशी किती छेडछाड करता हे जनता बारकाईने पहात असते. ती तुमचा केजरीवाल करण्यास मागे पुढे पाहणार नाही ! काही म्हणा ताज्या अर्थसंकल्पानंतर मध्यम वर्गासाठी असलेली स्पेस केजरीवाल यांच्याकडून हिरावली गेली आहे. ती काबीज करण्याची भाजपाची व्युहरचना यशस्वी झालेली दिसते.