ठाणे : ठाणे शहरातून चालविले जाणारे बनावट फिजिओथेरपी शिक्षण देणारे एक रॅकेट राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी उघडकीस आणले.
महाराष्ट्रातील विद्यपीठांमधून पदवी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊन ठाण्यातील सीईडीपी स्कील्ड इन्स्टिटय़ूटकडून झारखंड, आसाम, सिक्कीम येथील दोन खोल्यांच्या कथित विद्यापीठांचे प्रमाणपत्र दिले जात होते. या इन्स्टिट्युटवर कारवाई करून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढावे, अशी मागणी मर्जिया पठाण यांनी केली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवारच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांच्याकडे मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागातील विद्यार्थ्यांनी होत असलेल्या फसवणुकीबाबत कैफियत मांडली होती. या संदर्भात माहिती घेतल्यानंतर सदर सीईडीपी स्कील्ड इन्स्टिटय़ूटकडून ज्या विद्यापीठांचे प्रमाणपत्र दिले जात आहे, त्या विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मर्जिया पठाण यांनी आज ठाण्यातील राम मारुती रोड येथील सीईडीपी स्कील्ड इन्स्टिटय़ूटवर धडक दिली. संस्थेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
या संदर्भात पठाण यांनी सांगितले की, सीईडीपी स्कील्ड इन्स्टिटय़ूट फक्त फसवणूक करीत आहे. दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांना येथे बनावट कागदपत्रे तयार करून प्रवेश दिला जात आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, त्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जात असून महाराष्ट्रातील विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे शैक्षणिक शुल्क घेतल्यानंतर या मुलांचे प्रवेश झारखंड, आसाम, सिक्कीम आदी ठिकाणी करण्यात येते. एज्युकेशन लोनसाठी बनावट सह्या करून कर्ज काढण्यात येत असते. कॅपिटल नावाच्या विद्यापीठाशी या सीईडीपी स्कील्ड इन्स्टिटय़ूटचा टायअप असून त्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र दिले जात आहे. हा मोठा शैक्षणिक घोटाळा असून या संदर्भात आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत आहोत. जर कारवाई झाली नाही तर आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही पठाण यांनी दिला.
बकरे शोधून आणा, बक्षिस मिळवा
सीईडीपी स्कील्ड इन्स्टिटय़ूटकडून त्यांच्याकडे शिक्षण घेत असलेल्यांना विचित्र अमीष दाखवले जात आहे. एक एडमिशन केल्यास संबंधिताला सात हजार रूपये, दोनपेक्षा अधिक एडमिशन केल्यास फोन, लॅपटॉप बक्षिस दिले जाणार असल्याची ऑफर दिली जात आहे.