राजकीय नेत्यांशी व्यक्तीगत संबंध वर्षांनुवर्षाचे; राजकारण नाही!

प्रबोध डावखरे यांनी स्पष्ट केली वसंत नीति

ठाणे : विविध राजकीय नेत्यांशी व्यक्तिगत संबंध हे वर्षानुवर्षांपासून आहेत. हे राजकारण नसून वसंत नीति असल्याचे प्रबोध डावखरे यांनी स्पष्ट केले.

सध्या ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच वातावरण राजकीय झालेले होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली  आहे. विविध राजकीय नेत्यांशी संबंध ठेवणारी वसंतनिती अंगवळणी पडलेल्या प्रबोध डावखरे यांच्यावर राजकीय आरोप होऊ लागले. त्यावर प्रबोध डावखरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

स्व. वसंत डावखरे यांचे राजकीय क्षेत्रात असलेले एक पुत्र निरंजन डावखरे हे पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरे सुपुत्र प्रबोध डावखरे हे स्व.वसंत डावखरे यांच्या कारकीर्दीपासून राजकारणापासून दूर आहेत. दरम्यान प्रत्येक राजकीय नेत्यांशी त्यांचे वसंतनितीनुसार व्यक्तीगत संबंध आहेत. मात्र पदवीधर निवडणुकीत प्रबोध डावखरे यांचे भाऊ निरंजन डावखरे रिंगणात असतानाच प्रबोध डावखरे हे खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राजकारणात सक्रिय झाल्याचा आरोप होत आहे.

निरंजन डावखरे भाजपच्या तिकीटावर पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवत असल्याने प्रबोध डावखरे त्यांच्या विजयासाठी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे काही फोटो प्रसारित झाले, चर्चा आणि आरोप झाले. यावर प्रबोध डावखरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

निरंजन डावखरे माझे भाऊ असले तरीही त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचा विजय होईल. पण मी त्यांच्या मदतीसाठी कुठल्याही राजकीय नेत्यांना भेटलेलो नाही. माझे व्यक्तीगत राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. वडील ज्याप्रमाणे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवत होते, त्याच प्रमाणे निरंजन हे राजकरणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत वाटचाल करीत आहेत. मी व्यावसायिक आहे. त्यामुळे सध्याच्या राजकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. मी पूर्वीपासून राजकारणापासून दूर आहे. भविष्यात वेळ भासल्यास विचार होईल, पण तूर्तास माझ्या राजकीय नेत्यांशी भेटी राजकीय नसून वसंतनिती असल्याचा खुलासा प्रबोध डावखरे यांनी केला.