पटनी इंडस्ट्रीजने पदार्पणातच पारसिक बँकेला नमवले

४७व्या ठाणेवैभव करंडक स्पर्धेचे दमदार उद्घाटन

ठाणे: ‘ठाणेवैभव क्रिकेट स्पर्धा ही ठाणे शहराचा मानबिंदू असून असंख्य उदयोन्मुख क्रिकेटपटूंना संधी देण्याची मोलाची कामगिरी ‘ठाणेवैभव’मुळे उपलब्ध झाली’, असे गौरवोद्गार स्पोर्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांनी काढले.

४७व्या ठाणेवैभव वासंतिक करंडक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन डॉ. मढवी यांच्या हस्ते झाले. यावेळी संपादक मिलिंद बल्लाळ, व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ, स्पर्धा संघटक प्रल्हाद नाखवा आदी उपस्थित होते.

एखादी स्पर्धा सातत्यपूर्वक भरवण्याचे आव्हान ‘ठाणेवैभव’ने पेलले आणि त्यास क्रिकेट विश्वातील मान्यवरांचा आशीर्वाद लाभला हे आमचे भाग्य समजतो’, असे श्री बल्लाळ म्हणाले.

आज सेंट्रल मैदानात क गटात पहिला सामना जी पी पारसिक सहकारी बँक आणि स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या युनायटेड पटनी इंडस्ट्रीज या दोन संघात झाला. जी पी पारसिक सहकारी बँकेची अवघी ३० धावसंख्या युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने एक फलंदाज गमावून सहज ओलांडली. पटनी संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज अश्विन शेळकेने अवघ्या आठ धावांत पारसिक बँकेचा निम्मा संघ गारद केला. पदार्पणातच पटनी संघाने बलाढ्य पारसिक बँकेचा धुव्वा उडवल्याने पटनी संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

पारसिक बँकेच्या एकही फलंदाजाला दोन अंकी संख्या गाठता आली नाही. पटनी संघाच्या अश्विन शेळके याने चार षटकांत आठ धावा देत पाच बळी मिळवले. पारसिक बँकेची ३० धावसंख्या ओलांडताना पटनी संघाच्या दिशांत कोटीयन याने ११ चेंडुंत सहा चौकरांच्या साहाय्याने २५ धावा केल्या.