घोडबंदर कोंडीमुक्त करण्यासाठी अंतर्गत पर्यायी रस्त्यांचा उतारा

परिवहन मंत्री सरनाईक यांच्या सुचना

ठाणे: घोडबंदर मार्गावर नित्यनेमाने होणारी वाहतूक कोंडी कायमस्वरुपी सोडवण्यासाठी अंतर्गत पर्यायी रस्ते शोधून ते जोडण्यात यावेत, असे निर्देेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. यामुळे मुख्य मार्गावरील भार २० टक्के कमी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाणे महापालिका क्षेत्रातील शासन निधीतून होणाऱ्या विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. अरविंद पेंडसे सभागृहात करण्यात आले होते.

गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे कॉंक्रिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. त्यामुळे कामे एकाचवेळी पूर्ण होऊन वारंवार वाहतूक बंद करावी लागणार नाही. या काळात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होईल, मात्र भविष्यात चांगली सुविधा मिळेल. वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. घोडबंदर रोड परिसरातील अंतर्गत पर्यायी रस्त्यांची जोडणी झाल्यावर मुख्य घोडबंदर मार्गावरील किमान २० टक्के वाहतूक कमी होईल. त्यामुळे हे पाच पॅकेजमधील काम एमएमआरडीएने जलद करावे. त्यासाठी भूसंपादन किंवा इतर आवश्यक सहकार्य ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने समन्वय साधून तातडीने करून द्यावे, असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी दिले.

बैठकीच्या आरंभी, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत होत असलेल्या कामांची माहिती दिली. गायमुख घाट रस्त्याच्या कामाला वेग मिळणे आवश्यक आहे. तरच पावसाळ्यापूर्वी काम करता येईल, असे राव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, सूर्या प्रकल्पातून उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी ठाण्याला मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचीही माहिती त्यांनी या बैठकीत दिली. गेल्यावर्षी प्रमाणेच सर्व यंत्रणा एकमेकांशी समन्वय साधून रस्ते स्थितीवर लक्ष ठेवतील आणि दुरुस्तीची कामे पूर्ण केली जातील, असेही आयुक्तांनी सांगितले.

बैठकीस, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, एमएमआरडीएचे संचालक (प्रकल्प) अनिल साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.