पार्किंग प्लाझा सुरू होणार; १६०० वाहनांना निवारा मिळणार

ठाणे : ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पार्कींग प्लाझाचा वापर वाहनतळासाठीच अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला असून येत्या तीन महिन्यांत ते कार्यन्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या दहा मजली पार्कींग प्लाझामध्ये एकावेळी सुमारे १६०० वाहने उभी करणे शक्य होणार आहे. परिणाम येथील सेवा रस्त्यावरील बेकायदा पार्कींग दूर होऊन वाहतुकीचा अडथळा कमी होण्यास मदत होणार आहे.
कोव्हिड काळात हजारो ठाणेकरांचा जीव वाचवण्यासाठी वरदान ठरलेले ज्युपिटर रुग्णालयाजवळील पार्कींग प्लाझा गेल्या काही वर्षांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. वाहनतळाची व्यवस्था व्हावी यासाठी दहा मजली उभारण्यात आलेल्या या पार्कींग प्लाझाचे रुपांतरण रुग्णालयात करण्याच्या हालचाली सुरू होत्या. एका खासगी संस्थेला हे पार्कींग प्लाझा आंदण देऊन रुग्णसेवा चालवण्याचा घाट होता. याला सर्व स्तरातून विरोधही दर्शवण्यात आला. या वादात ही वास्तू गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धूळ खात पडली आहे. तर दुसरीकडे पार्कींगची व्यवस्था नसल्याने त्याच मार्गावरील सर्व्हिसरोडचा ताबा बेकायदा वाहनतळांनी घेतला आहे. वास्तविक ठाण्यातून घोडबंदरमार्गे जाताना माजिवडे पोखरण रोड नं. १ आणि २ तसेच सेवा रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
वास्तविक या परिसरातील वर्तकनगर, लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, शिवाईनगर, गांधीनगर, सुभाष नगर, नळपाडा आणि लक्ष्मी-चिराग नगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक-मालक राहतात. त्यांच्या उपजिविकेचे साधन असलेल्या रिक्षा रस्त्याच्या दुतर्फा लावल्याने वाहतुकीला फार मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. तसेच या परिसरामध्ये मोठमोठी गृहसंकुले असल्याने त्या ठिकाणी राहणार्‍या रहिवाश्यांच्या गाड्याही रस्त्याच्या दुतर्फा पार्क केल्या जातात. विवियाना मॉलमध्ये येणार्‍या ग्राहकांच्या आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये रूग्णांना भेटावयास येणार्‍या नातेवाईकांच्या गाड्याही मोठ्या प्रमाणात या सेवा रस्त्यावर पार्क केल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे धूळ खात पडून असलेले पार्कींग प्लाझा सुरू करण्याच्या मागणीला जोर धरू लागला.
माजिवडा परिसरामध्ये पार्किंग प्लाझाची निर्मिती तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शेठ ग्रुपच्या विकास प्रकल्पाच्या माध्यमातून केली होती. परंतु २०२० मध्ये आलेल्या कोव्हिड महामारीत हे पार्कींग प्लाझाचे रुपांतर तात्पुरत्या कोव्हिड सेंटरमध्ये करण्यात आले. कोव्हिड गेल्यानंतरही येथे आरोग्य सामग्री तशीच ठेवण्यात आली. उलट या वास्तूचा वापर कायमस्वरुपी हॉस्पिटलमध्ये करण्याचा विचार पुढे आला. पण पार्किंग प्लाझाची प्रत्येक मजल्याची उंची ही आठ फुटांपेक्षा कमी असून या जागेची निर्मिती पार्किंग प्लाझाच्या नियमानुसार करण्यात आली आहे. हॉस्पिटलसाठी ही जागा नियमानुसार वापरता येऊ शकत नसल्याची बाबही पुढे आली आहे. कायद्याच्या कक्षेत प्रस्तावित रुग्णालय बसत नसल्याने महानगरपालिकेच्या या चुकीच्या प्रस्तावाला नगरविकास विभागसुध्दा मान्यता देयण्याची शक्यताही मावळली आहे.
दहा मजल्याच्या या पार्कीग प्लाझामध्ये सुमारे १६०० वाहने पार्क करता येतील एवढी क्षमता आहे. यामध्ये रिक्षा, ओला, टॅक्सीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय दुचाकी व खासगी चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करणार्‍या चालक, मालकांना दिलासा मिळणार आहे. तर सेवा रस्त्यावरील बेकायदा पार्कींगची समस्याही दूर होणार आहे.
सध्या येथील सहा मजले पार्कींगसाठी सज्ज आहेत. पण सात ते दहा मजल्यापर्यंत फ्लोरिंगचे काम करण्याची गरज आहे. याशिवाय सीसीटीव्ही यंत्रणा, एण्ट्री, एक्सिट पॉईंट इत्यादी काही किरकोळ पण महत्वाची कामे शिल्लक आहेत. ही कामे तीन महिन्यात पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पावसाळ्याच्या सुमारास हे पार्कींग प्लाझा सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.