महाराष्ट्राचे महानायक दादा कोंडके यांचे चित्रपट असो किंवा सुप्रसिद्ध विनोदवीर सचिन पिळगावकर-अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सदाबहार चित्रपट, यातील विनोदाबरोबरच त्याचेही गाण्यांनी, संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली. विनोद आणि संगीताची हीच परंपरा कायम राखण्याचं काम ‘पांडू’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने केलं. या चित्रपटाला चित्रपटगृहात रसिक प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. याच रसिक प्रेक्षकांसाठी झी मराठी वाहिनी ‘पांडू’ हा चित्रपट टेलिव्हिजनवर प्रथमच सादर करणार आहे.
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या धमाल जोडीचा अफलातून अभिनय, सोबतीला सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळीसारख्या गुणी अभिनेत्रींच्या कसदार भूमिका, प्रविण तरडे आणि आनंद इंगळेसारखे कसलेले सहकलाकार, थिरकायला लावणारं संगीत आणि विजू माने यांचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन, या सगळ्या दिग्गजांच्या योगदानामुळे रंगलेली ‘पांडू’सारखी दर्जेदार कलाकृती येत्या रविवारी संध्याकाळी ७ वाजता प्रथमच टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.
याबद्दल बोलताना भाऊ कदम म्हणाला, ‘सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाचे दोन क्षण देणे आणि त्यांचा ताण हलका करणे यासारखं दुसरं पुण्य नाही. ‘पांडू’ हा सिनेमा प्रेक्षकांची ही गरज १०० टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत टेन्शनफ्री होऊन रविवारी या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा.”
पांडू चित्रपट झी मराठीवर प्रसारित होणार याबद्दल कुशल बद्रिके म्हणाला, “मी या चित्रपटात महादू हवालदाराची भूमिका साकारतोय. मी आणि भाऊ, आम्ही आजवर विविध माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. हीच परंपरा या चित्रपटाने कायम ठेवली आहे. गेल्या २१ वर्षांत आमच्यातली मैत्री खूप घट्ट विणली गेलीय आणि हीच मैत्री पांडू आणि महादूच्या निमित्तानं प्रेक्षकांना आता छोट्या पडद्यावर घरबसल्या अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नुसतं हसवणारच नाही तर एक नवी ऊर्जाही देईल हा विश्वास मला आणि आमच्या संपूर्ण टीमला आहे.”
त्यामुळे भाऊ आणि कुशल यांच्या भन्नाट केमिस्ट्रीने रंगलेला पांडू चित्रपट पाहायला विसरू नका रविवार ३० जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर