पंडित भीमसेन जोशी इस्पितळ ‘पीपीपी’ तत्वावर चालवणार

भाईंदर: शहरातील पंडित भीमसेन जोशी हे शासकीय रुग्णालय सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने चालवण्याचा प्रस्ताव राज्य शासनापुढे सादर करण्यात आला आहे. शासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे गरीबांसह सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाईंदर पश्चिम येथे २०१६ मध्ये भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, या रुग्णालयाच्या देखभालीकडे राज्य शासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे दिवसेंदिवस येथील समस्या वाढल्या आहेत. २०० रुग्णशय्या असलेल्या या रुग्णालयात अनेकदा रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येऊ लागल्या. त्यामुळे हे रुग्णालय ‘पीपीपी’ पद्धतीने चालवण्यास देण्याचा प्रस्ताव स्थानिक आमदार गीता जैन यांच्या पुढाकाराने राज्य शासनाच्या आरोग्य विभागापुढे सादर करण्यात आला आहे. यात रुग्णालय सांभाळण्याची जबाबदारी ही मोठ्या वैद्यकीय संस्थांवर सोपावली जाणार आहे.
या संदर्भात २४ जानेवारी रोजी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यालयात विशेष बैठक झाली. या वेळी रुग्णालयाचा प्राथमिक आराखडा सादर करण्यात आला. यात रुग्णालय हे ‘पीपीपी’ पद्धतीने चालवण्यास दिल्यास त्या ठिकाणी पिवळ्या आणि केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना मोफत उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रुग्णालयाचे कामकाज हे राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी ते पूर्णतः ‘कॅशलेस’ पद्धतीने चालवण्याचा प्रस्ताव साद करण्यात आला आहे. यास राज्य शासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती जैन यांनी पत्रकारांना दिली.