समृद्धीवरील आमने नोड बीकेसी, नोएडाप्रमाणे विकसीत होणार

नाशिक महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: समृद्धी महामार्गावरील आमने नोड बीकेसी, नोएडाप्रमाणे विकसीत होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातून होणारी वाहतूक लक्षात घेता जेएनपीए आणि अहमदाबादकडे जाणाऱ्या मार्गासाठी पर्याय शोधण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

या भागातील नाशिक महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समृद्धी महामार्गावरील आमने नोड कामाचा आढावा घेतला. यावेळी शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, रस्ते सचिव श्री. दशपुते आदी यावेळी उपस्थित होते.

ठाणे, रायगड, पालघर याभागाला आमने नोड जोडला जाणार असून भविष्यातील औद्योगिक क्षेत्र म्हणून ते विकासीत होणार आहे. याभागाचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीएची नियुक्ती करण्यात आली आहे. आमने नोड १० हजार ७९१ हेक्टर क्षेत्र असून त्याठिकाणी इंडस्ट्री पार्क, लॉजिस्टीक हब, ॲग्रीक्ल्चर हब, फुड प्रोसेसिंग पार्क आदी विकास कामे प्रस्तावित आहेत.
आमने नोडमुळे भविष्यातील वाढणारी वाहतुक लक्षात घेता नियोजन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. या भागातून जाणारा नाशिक महामार्गाचे काम वेळेत आणि पावसाळ्यापूर्वी करण्याचे निर्देश देतानाच वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. हे काम पूर्ण होईपर्यंत नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

आमने नोडकडून नाशिक, मनोर वाडा रस्ता, जेएनपीएकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्याय शोधावेत. वाहतुक नियंत्रित करण्यासाठी अवजड वाहनांसाठी वेळेचे नियमन तसेच ट्राफीक वॉर्डनची संख्या वाढवण्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.