१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन

भारतीय भाषांमधील नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी

नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्य सृष्टीची शिखर संस्था. नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करत असताना अनेक अभिनव उपक्रम, संकल्पना नाट्यपरिषद सातत्याने राबवत असते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे प्रथमच विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले, उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह श्री. अजित भुरे , कार्यकारिणी सदस्य सविता मालपेकर आदि मंडळी उपस्थित होती.

२० फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत मुंबईत भारतीय भाषांमधील हा नाट्य महोत्सव रंगणार आहे. यशवंत नाट्य मंदिर, जयश्री आणि जयंत साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह या ठिकाणी या महोत्सवातील नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

या महोत्सवा मागचा उद्देश सांगताना नाटयपरिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे म्हणाले की, या महोत्सवामुळे मुंबईतील कलाकारांना आणि नाट्यरसिकांना वेगवेगळ्या राज्यातील, प्रांतातील नाटकं, त्यांचं सादरीकरण, तिथल्या कलाकारांविषयीच्या गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहे. बंगाली, तामिळ, इंग्रजी, मराठी अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण या विशेष नाट्य महोत्सवात होणार आहे.