ठाणे: ऑनलाईन पद्धतीने औषध खरेदी करणे एका तरुणीला महागात पडले. या तरुणीला मधुमेह असून तीने ऑनलाईन पद्धतीने ३४,५०० रुपयांची औषधे खरेदी केली होती, परंतु हे औषध सीमा शुल्क, वस्तू सेवा कर इतर विभागांनी अडवल्याचे सांगून तिच्याकडून १४ लाख ५०,८६९ रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेली ३२ वर्षीय मुलगी कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिला मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपूर्वी ती एका संकेतस्थळावर विशिष्ट कंपनीचे औषध शोधत होती. त्यावेळी त्या कंपनीचे औषध उपलब्ध असल्याचे तिला संदेश प्राप्त झाला. तरुणीने तत्काळ ऑनलाईन ३४,५०० रुपये भरून हे औषध खरेदी केले. दोन दिवसांनी तिला व्हाॅट्सअ ॲप संदेश प्राप्त झाला. या संदेशात हे औषध पोर्तुगाल सिमा शुल्क विभागाच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तेथे नोंदणीसाठी २० हजार ५६४ रुपये तिला पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्या तरुणीने ही रक्कम ऑनलाईनरित्या पाठविली. त्यानंतर तिला परवाना, कर आणि सिमा शुल्क रक्कम, औषधांचा विमा, रस्ते सुरक्षा आणि स्थानिक मुंद्राक, अन्न व औषध प्रशासन, केंद्रीय आणि राज्य वस्तू-सेवा कर विभाग अशा वेगवेगळ्या ठिकाणी औषध अडविण्यात आल्याचे सांगून तिच्याकडून टप्प्याटप्प्याने १४ लाख ५०,८७९ रुपये उकळण्यात आले.
काही दिवसांनी पुन्हा तिला संदेश प्राप्त झाला. हे औषध सिमा सुरक्षा दलाने अडविल्याचे म्हटले होते. त्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. तरुणीला संशय आल्याने तिने सिमा सुरक्षा दलाच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. अशाप्रकारे कोणतेही औषध अडविण्यात आले नसल्याचे तिला सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुवारी तिने याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे, गुन्हा दाखल झाला आहे.