उत्पादन वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण

नवी मुंबई: राज्यात पडलेल्या थंडीमुळे कांदा उत्पादनास पोषक वातावरण तयार झाल्याने कांदा उत्पादनात वाढ होत आहे. त्यामुळे वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात नवीन कांद्याची आवक वाढली आहे. आवक वाढत चालल्याने दरात घसरण होत असून कांदा ९ ते १५ रू प्रतिकीलोने विकला जात आहे. शनिवारी बाजारात १२३ गाड्या कांदा आवक झाली होती.
पावसाळ्यात कांद्याचे पीक कमी अस  बाजारात मागील दीड ते दोन महिने कांद्याची आवक कमी होती. बाजारात नवीन कांदा नसल्याने जुना कांदा बाहेर काढला होता. त्यामुळे तीन आठवड्यापूर्वी १८ ते २२ रुपयांवर असलेला कांदा मागील आठवड्यात १८ ते २० रुपयांवर स्थिरावलेला होता. मात्र आता थंडीमुळे कांदा उत्पादनास पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पर राज्यासोबतच राज्यातील बारामती, सातारा येथील नवीन कांदा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
दोन तीन दिवसांपासून बाजारात १०० च्या वर गाड्यांची आवक होत असून शनिवारी १२३ गाड्या आवक झाली. बाजारात दिवसागणिक आवक वाढत असल्याने दरात घसरण होत चालली आहे. शनिवारी कांदा ९ ते १५ रू प्रति किलोने विकला गेला. सध्या कांद्याचे उत्पादन पाहता आणि शेतकऱ्यांची पुढील पिकासाठी लागणारी आर्थिक निकड पाहता दर आणखी उतरू शकतात. मार्च महिन्यापर्यंत हे दर आणखी घसरण्याची शक्यता असून एप्रिल महिन्यात कांदा पुन्हा उसळी घेईल, अशी माहिती कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.