नवी मुंबई: वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा बाजारमधील सर्व इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. मात्र त्यावर अजून अंतिम निर्णय झाल्याने व्यापाऱ्यांना पर्यायी जागा देण्यात आली नाही. त्यामुळे येथील व्यापारी आजही धोकादायक गाळ्यातूनच व्यापार करीत आहेत. दरम्यान बाजारातील सर्व गाळ्यांना लोखंडी खांबाचा आधार देऊन गाळे दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे बाजार समितीचा पुनर्विकास पुन्हा रखडणार का? अशी चर्चा आता बाजार आवारात सुरू आहे.
जुन्या मुंबईतील बाजार समितीतील गर्दी कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शासनाने जुन्या मुंबईतील घाऊक बाजार नवी मुंबईतील तुर्भे येथे टप्याटप्याने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वात प्रथम सन १९८१ मध्ये कांदा-बटाटा मार्केट स्थलांतराचा निर्णय झाला. सन १९७९/८० च्या दरम्यान सिडकोने तुर्भे येथील ७.९२ हेक्टर (७९१७८.७३ चौरस मिटर) भूखंडावर कांदा, बटाटा बाजाराचे बांधकाम केले. परंतु निकृष्ट बांधकाम दर्जामुळे मार्केटमधील गाळ्यांचे बांधकाम पडू लागले. २०ते २५ वर्षात बाजार समिती धोकादायक स्थितीत झाली असून सन २००३ पासून महापालिकेच्या धोकादायक यादीत समाविष्ट होत आहे. मागील दोन वर्षांपासून बाजाराचा पुनर्विकास करण्याबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र निवडणुकीमुळे या चर्चांना, बैठकींना ब्रेक लागला होता.
सचिवांच्या दालनातील छताचे प्लास्टर कोसळल्याने पुन्हा कांदा-बटाटा पुनर्विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानिमित्ताने बाजारात पुन्हा पुनर्विकासाबाबत बैठकांवर बैठका घेऊन निर्णय अंतिम टप्प्यापर्यंत आला होता. मात्र आता कांदा-बटाटा बाजाराचा पुनर्विकास विषय मावळल्याचे दिसत आहे. त्यातच एपीएमसी प्रशासनाने आता बाजारातील दिवसेंदिवस जीर्ण होत चाललेल्या गाळ्यांच्या पुढील आणि मागच्या पिलरला लोखंडी खांबांचा आधार देण्याचे काम सुरू केले आहे. कांदा-बटाटा बाजारात एकूण २४० गाळे असून या सर्व गाळ्यांना टेकू देण्याचे काम सुरू असून याकरिता अंदाजित ३५ ते ४० लाख खर्च करण्यात आलेला आहे.
कांदा-बटाटा बाजाराच्या पुनर्विकासाचा विषय सुरू आहे, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव गाळ्यांना लोखंडी अँगल बसविण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुरेश मोहाडे यांनी दिली.