एक ठाणेदार, अनेक दावेदार !

ठाणे मतदारसंघात होणार तिरंगी लढत

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपातून अनेक इच्छुक पुढे येत असले तरी दोन टर्म आमदार राहिलेल्या आमदार संजय केळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते, असे चित्र आहे. दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसे हे देखील रिंगणात उतरणार असल्याने होणारी तिरंगी लढत सर्व पक्षियांसाठी दमछाक करणारी ठरू शकते, असे बोलले जात आहे. अद्याप उमेदवारी घोषित झालेली नसली तरी या मतदारसंघात उमेदवारांची दमछाक करणारी तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

विद्यमान आमदार असलेल्या जागा त्याच पक्षांना देण्यात येतील, असे महायुतीत ठरले असून ज्या जागा धोकादायक आहेत तेथे बदल होण्याची शक्यता आहे. यानुसार ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघात भाजपकडून तिकीट मिळावे म्हणून इच्छुकांची गर्दी वाढली आहे. यात भाजपचे संदीप लेले, शहर अध्यक्ष संजय वाघुले, कृष्णा पाटील, डॉ.राजेश मढवी यांचा समावेश आहे. यातील श्री.लेले यांना ग्राहक संरक्षण समितीचे राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. भाजपची यादी जाहीर होण्यास किंचित कालावधी उरला असताना आ. संजय केळकर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका बसेल अशी शक्यता विरोधक व्यक्त करत असले तरी २०१९ च्या निवडणुकीत एकांगी लढणाऱ्या भाजपाला एक दिलाने लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर विजय मिळवता आला. या मतदारसंघात पक्षाशी एकनिष्ठ आणि वचनबद्ध मतदारांचाही मोठा वर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय आमदार संजय केळकर यांचा दांडगा जनसंपर्क आणि केलेल्या विकासकामांचा फायदा मागील निवडणुकीत झाल्याचे दिसून आले.

ठाणे शहर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे तिकीट मिळावे म्हणून शिंदे गटातील माजी नगरसेवक संजय भोईर हे सुद्धा इच्छुक आहेत. त्यांना तिकीट मिळाले नाही तर ते अपक्ष लढू शकतात असे बोलले जाते. दुसरीकडे मनसेचे अविनाश जाधव हे देखील पुन्हा या मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत ते विजयापासून २० हजार मते दूर होते. त्यावेळी एकसंघ असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडून त्यांना छुपी मदत मिळाल्याचे बोलले जात होते. यावेळी देखील तशी परिस्थिती निर्माण झाली तर भाजपा उमेदवाराला विजयासाठी मनसे आणि ठाकरे गटाच्या उमेदवाराशी जोरदार टक्कर द्यावी लागेल, हे निश्चित. या लढतीत ठाकरे गटाकडून माजी खासदार राजन विचारे किंवा केदार दिघे यांना देखील तिकीट मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (उबाठा पक्ष) माजी खासदार राजन विचारे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यात लढत झाली. यामध्ये महाविकास आघाडीचीच सरशी होणार असा फाजील आत्मविश्वास महाविकास आघाडीला नडला आणि या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के हे दोन लाख १७ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. नरेश म्हस्के यांना सात लाख ३२ हजार १०९ तर विचारे यांना ५ लाख १५ हजार ३ अशी मते पडली. या निवडणुकीत भाजप ताकदीनिशी शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे दिसून आले.

लोकसभा निवडणुक २०२४

उमेदवार पक्ष मिळालेली मते
नरेश म्हस्के (शिवसेना) ७,३२,१०९
राजन विचारे (उबाठा) ५,१५,०३

ठाणे विधानसभा निकाल २०१९
उमेदवार पक्ष मिळालेली मते
संजय केळकर (भाजप) ९२२९८
अविनाश जाधव (मनसे ) ७२,८७४