लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात प्रस्ताव मांडल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाद्वारे १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार, काँग्रेसचे आठ वेळा खासदार राहिलेले कोडिकुनिल सुरेश यांचा आवाजी मतदानाने पराभव केला. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले. यावेळी त्यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू होते.

यापूर्वी १९५२, १९६७ आणि १९७६ साली लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची ही चौथी वेळ होती. ही निवडणूक जिंकून भारतीय लोकसभेच्या इतिहासात सलग दोन वेळा अध्यक्षपद भूषवणार्‍या अय्यंगार आणि जीएमसी बालयोगी यांच्या यादीत ओम बिर्ला यांच्याही नावाचा समावेश झाला आहे.