ठाणे : जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या मात्र नोव्हेंबर २००५ पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या शिक्षकांना यापूर्वी परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने एका याचिकेत या शिक्षकांच्या सेवेबाबत पडताळणी करून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होते किंवा कसे याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने संबंधित शिक्षकांची सुनावणी घेऊन कागदपत्रे पडताळणी अंती या ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत विशेष पाठपुरावा प्रत्येक सोमवारी आढावा बैठक घेऊन शिक्षकांचा बराच काळ प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न जिल्हा परिषदे मार्फत करण्यात येत आहेत. कामकाजाचा वेळोवेळी पाठपुरावा होत असल्याने ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित शिक्षक व शिक्षक संघटना यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथ) बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केले आहेत.