पातलीपाडा येथील मुख्य वीजवहिनीला आग, सात तास वीज खंडित
ठाणे: महावितरणच्या पातलीपाडा येथील वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वहिनीला सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास आग लागल्याने अर्ध्या घोडबंदरचा वीज पुरवठा खंडित झाला. ऐन ऑक्टोबर हिटमध्ये हा सर्व प्रकार झाल्याने नागरिक सात तास उकाड्याने हैराण होते.
ऑक्टोबर हिटमुळे नागरिक उकाड्याने अक्षरशः त्रस्त झाले आहेत त्यामुळे एसी आणि कुलर वापरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र अद्याप महावितरणकडून भारनियमनाचे कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र सोमवारी घोडबंदरच्या रहिवाशांनी सात तास भारनियमनाचा अनुभव घेतला. पातलीपाडा येथील ज्या वाहिनीमधून अर्ध्या घोडबंदरला वीज पुरवठा केला जातो, त्या वाहिनीला ऐन सकाळी ९ च्या दरम्यान आग लागली, त्यामुळे वीज पुरवठा सात तास खंडित झाला.
नागरिकांची कार्यालयात जाण्याची वेळ आणि गृहिणींची नाश्ता आणि स्वयपांक बनवण्याची वेळ असल्याने गृहिणींचे सर्व वेळापत्रकच यामुळे कोलमडले. तासाभरात वीजपुरवठा सुरळीत होईल या आशेवर बसलेल्या नागरिकांना अक्षरशः सात तास उकाड्यात काढावे लागले. सात तास उलटल्यानंतर संध्याकाळी ४ च्या दरम्यान वीज पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कासारवडवली, आनंद नगर, वाघबीळ, ग्रीन व्हॅली, प्रेस्टिज व्हॅली, रोजा बेला, पंचामृत, अशा मोठ्या गृहसंकुलांना आणि परिसराला याचा फटका बसला.
विशेष म्हणजे बाहेरून जेवणाची ऑनलाईन ऑर्डर देऊनही डिलिव्हरी बॉय लिफ्ट सुरु नसल्याने १५ मजले कोण चढणार या भीतीने इमारतीच्या खालीच ऑर्डर ठेऊन जात होते. त्यामुळे नागरिकांना खाली उतरून ऑर्डर घ्यावी लागली.