रिंग रोड प्रकल्पात अडथळे; कल्याणकरांच्या नशिबी वळसे

दुर्गाडी ते गांधारी ब्रिज टप्प्यातील अडथळे दूर करण्याची मागणी

कल्याण : कल्याण रिंग रोड प्रकल्पातील दुर्गाडी ते गांधारीपर्यंतचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे, मात्र काही ठिकाणी भूसंपादन झाले नसल्याने या रस्त्यात अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी येथील नागरिकांना आधारवाडी येथून वळसा मारून यावे लागत आहे. हे अडथळे दूर करण्याची मागणी ऋतु गृहसंकुलातील रहिवाशांनी केली आहे.

डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात गाठता यावे यासाठी उभारण्यात येत असलेल्या कल्याण रिंग रोडच्या आठ टप्प्यांपैकी टप्पा चार ते सात (दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून काही ठिकाणी असलेले अडथळे वगळता रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर उर्वरित टप्प्यांचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या आणि प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन देखील जलदगतीने करण्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत दिल्या होत्या.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या वाहतुकीला अधिक गती प्राप्त करून देणारा कल्याण रिंग रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर वाहतुकीला एक नवा आयाम प्राप्त होणार आहे. कल्याण रिंग रोड या प्रकल्पाची आठ टप्प्यांमध्ये उभारणी करण्यात येत आहे. यातील टप्पा – ४ (दुर्गाडी ब्रिज ते गांधारे ब्रिज), टप्पा – ५ (गांधारी ब्रिज ते मांडा जंक्शन), टप्पा – ६ (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), टप्पा – ७ (टिटवाळा जंक्शन ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. तर रस्ता नागरिकांच्या सेवेत आला आहे.

टप्पा – ३ (मोठा गाव ब्रिज ते गोविंदवाडी रोड) या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे. टप्पा – १ (हेदुटणे ते शिळ रोड) आणि टप्पा – २ (शीळ रोड ते मोठागाव ब्रीज) या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करून हे देखील काम २०२६ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. या प्रकल्पामुळे काटई-टिटवाळा हे एक तासाचे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. अवजड वाहनांची वाहतूक देखील या मार्गावरून होणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर भार येणार नाही. यामुळे शहरांतर्गत वाहतुकीला गती मिळेल. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील वाहतूक सेवा अधिक सोयीची आणि गतिमान होणार आहे.

दुर्गाडी ते गांधारी या टप्प्यातील रस्त्याचे काम होऊन दोन ते तीन वर्ष झाली आहेत. मात्र काही ठिकाणी काम अपूर्ण आहे. यामुळे ऋतु गृहसंकुल आणि परिसरातील इतर गृहसंकुलातील रहिवाशांना दुर्गाडी ते गांधारी हे अंतर पूर्ण कारण्यासाठी या मार्गात असलेल्या स्पीड ब्रेकर, सिग्नलमुळे तब्बल 20 ते 25 मिनिटे लागतात. दुर्गाडी ते गांधारी या रिंगरोड वर स्वच्छतेचा अभाव असून जो रस्ता बनवला आहे त्याची देखभाल करणे आवश्यक आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास दुर्गाडी ते गांधारी हे अंतर अवघ्या 5 मिनिटांच्या आत कापता येणार असल्याची प्रतिक्रिया ऋतु गृहसंकुलातील रहिवासी सुनील खुळे यांनी दिली.

दरम्यान अधिकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार दुर्गाडी ते गांधारी ब्रिज पर्यंतचा टप्पा केडीएमसीने जागा उपलब्ध करून दिल्यावर २०२७ पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या टप्प्यातील एकूण ७५० मी जागेपैकी १४० मी जागा काम करण्यासाठी उपलब्ध आहे. उर्वरित जमीन अधिग्रहनाची प्रक्रिया केडीएमसीद्वारे प्रगतीपथावर आहे. या कामासाठी ४० करोड रुपये इतकी रक्कम कल्याण बाह्यवळण भाग ३ च्या कामामध्ये समाविष्ट केलेली आहे.