आता ओल्या-सुक्या कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच लागणार

* ओवळा-मजिवडा मतदारसंघाला मिळवणार ५० टोगो व्हॅन
* डम्पिंग ग्राऊंडवरील ताण कमी होणार

ठाणे : शहरात गोळा झालेल्या ओल्या-सुक्या कचऱ्याची आता डम्पिंग ग्राऊंडवर जाण्याआधीच अत्याधुनिक टोगो व्हॅनमध्ये विल्हेवाट लागणार आहे. त्यापासून तयार झालेले खत शहरातील उद्यानांना दिले जाणार आहे. ओवळे-माजिवडे मतदारसंघात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून अशा ५० व्हॅन मिळणार असून सध्या दोन व्हॅनचे प्रायोगिक तत्त्वावर लोकार्पण करण्यात आले आहे. ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच आहे.

या टोगो व्हॅनमध्ये कचरा टाकल्यावर त्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण होते. कचऱ्याचे तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होते. प्रायोगिक तत्वावर दोन टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या असून, आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचे प्रात्यक्षिक आज पत्रकार परिषदेत दाखवले. भविष्यात ओवळे-माजिवडे मतदारसंघासाठी ५० व्हॅन देण्यात येणार आहेत.

तयार झालेल्या खताचा वापर मतदारसंघातील उद्याने, रस्त्यात दुतर्फा लावलेली सुशोभित झाडे, लॅण्डस्केप येथे करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोगो व्हॅन कचरा प्रकल्पासाठी निधी दिला असून राज्यात असा प्रकल्प पहिल्यादांच होतो आहे, अशी माहीती प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.