आता संयम सुटला, सर्व पुरावे सादर करणार!

आव्हाडांचे आरोप बिनबुडाचे – नजीब मुल्ला

नजीब मुल्ला यांनी आव्हाडांविरुद्ध बाह्या सरसावल्या

ठाणे : एकेकाळी गुरू-शिष्य म्हणून ठाण्यात सतत प्रकाशझोतात असलेले माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यामधून आता विस्तवही जात नसून मागील काही दिवसांत एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या झडणाऱ्या फैरी थांबण्याचे नाव घेत नाही.

दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अभिजीत पवार यांनी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांचे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ते आरोप खोटे असल्याचा दावा मुल्ला यांनी केला आहे. आम्ही अभिजीतला धमकावले नसून तोच आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक होता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. परमार आत्महत्या प्रकरणात कोणी पैसे घेतले हे सुध्दा आम्हाला माहित आहे. मात्र त्यात बळी माझा गेला असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

गुरुवारी आव्हाड आणि अभिजीत पवार यांनी नजीब मुल्ला यांच्यावर केलेल्या आरोपानंतर शुक्रवारी नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरु वाघमारे आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते. तुम्ही माझा संयम बघितला आहे, मात्र आता आम्ही देखील तुमच्या विरोधातील भ्रष्टाचार बाहेर काढू, सरकारी जागेवर अतिक्रमण कसे केले, बंगला कशा पध्दतीने उभारला गेला, याचे सर्व पुरावे आम्ही देऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही अभिजीत पवारला आत्महत्येस प्रवृत्त केले असले तर त्याची तक्रार करा. एसआयटीची मागणी करा. आम्ही शासनाकडे त्याचा पाठपुरावा करु असेही खुले आव्हान मुल्ला यांनी आव्हाड यांना दिले. मॉलमध्ये कशापध्दतीने अभिजीतच्या पत्नीला फोन आला होता, कशा पध्दतीने आपण त्यांना धमकी दिली त्याचे रेकॉर्डिंग देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. कळव्यातील शासकीय जागेवर कशा पध्दतीने कार्यालय थाटण्यात आले याचे पुरावे सुध्दा आता सादर केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. महापालिकेतील ठेकेदार कसा जीव देण्यास जात होता, त्याच्या पाया कोण पडले याचे उत्तरही तुम्हाला द्यावे लागेल असेही त्यांनी सांगितले. खुनाचा आरोप माझ्यावर करत आहात, मात्र न्यायालयाने जे सत्य होते, ते सर्व सांगितले आहे. या उलट मी मोठा होत असल्याने ते तुम्हाला खुपत होते, म्हणूनच मला खुनात अडकविण्याचा डाव कसा रचला याचेही पुरावे आता सादर करणार आहे. तसेच आपण जमविलेल्या मायेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असून हे सर्व पुरावे त्याच अभिजीतने आम्हाला दिले असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. शिवाय याविरोधात मानहानीचा दावाही ठोकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड यांनी कशी डॉक्टरकी मिळविली हे सुध्दा ठाऊक असून सहा महिने कोणी अभ्यास केला, कोणी परिक्षा दिली, तुम्ही फक्त सही करण्याचे काम केले असून आता त्याची देखील पोलखोल केली जाणार असल्याची माहिती मुल्ला यांनी यावेळी दिली.