नवीन मुख्यालयासाठी एकही झाड तोडू देणार नाही

रेमंड परिसरातील रहिवासी ठामपावर धडकले

ठाणे : रेमंडच्या जागेवर ठाणे महापालिकेचे नवीन मुख्यालय बांधण्याला रेमंडच्या रहिवाशांचा विरोध कायम असून गुरुवारी या सर्व रहिवाशांनी थेट ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागात धडक दिली. नवीन मुख्यालयाची जागा जोपर्यंत बदलण्यात येत नाही तोपर्यंत या जागेवरील एकही झाड तोडून देणार नाही, असा निर्धार या सर्व रहिवाशांनी केला आहे.

ठाणे शहराच्या मंजूर सुधारित आराखड्यानुसार ठाणे महानगर पालिका प्रशासकीय भवन बांधण्याच्या निर्णयाबाबत ठाणे महानगर पालिकेने सूचना व हरकती मागविल्या होत्या. टेक्स एक्स हॅबिटॅट मधील ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी या आरक्षण बदलास आक्षेप घेतला असून या अनुषंगाने २४ सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी शहर विकास व नियोजन अधिकार संग्राम कानडे यांच्या दालनात आज झाली. या सुनावणीसाठी टेक्स एक्सचे जवळपास ६० नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या सूचना हरकती व मागण्या राज्य शासनाकडे मांडण्यात येणार असल्याचा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी दिला. यावेळी टेक्स एक्सच्या नागरिकांनी आपल्या हरकती, सूचना व मागण्या प्रभावीपणे मांडल्या.

२५ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यास स्थगिती दिली आहे, ती त्वरित उठविण्यात यावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. तसेच जोपर्यंत सुनावणीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत एकही झाड तोडू देणार नाही, असा इशारा यावेळी रहिवाशांनी दिला.

आम्ही येथील हिरवळ पाहूनच सदनिका घेतल्या. ऱेराच्या वेब साईटवर बगीचा आरक्षणाची नोंद आहे. येथील झाडे तोडायला व इमारत बांधायला आमचा विरोध आहे. ठाणे कार्यालय दुसऱ्या जागेत होऊ शकते तर मग या जागेचा हट्ट कशासाठी? याला ठाणे बदलतंय असे म्हणायचे का? असा सवाल यावेळी स्थानिक रहिवाशी यांनी केला.