पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे सज्ज

१२ वर्षांच्या कामाचा अनुभव गाठीशी

ठाणे: मागील १२ वर्षे पदवीधर मतदारसंघात केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षातर्फे आमदार निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदार संघाच्या मैदानात उतरणार आहेत. १ जून किंवा ७ जूनला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. त्याकरिता १ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली जाणार आहे. या मतदार संघाचे ते दोनवेळा आमदार झाले असून यावेळी ते हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मागील १२ वर्षांत त्यांनी कोकण विभागात विधायक कामे केली आहेत. पदवीधरांच्या प्रश्नावर अनेकदा विधानपरिषदेत आवाज उठवला असल्याचे त्यांचे समर्थक दावा करत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आहे. निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार असल्याने त्यांनाच या मतदार संघातून महायुतीतर्फे उमेदवारी दिली जाईल, असा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे. आ.डावखरे यांनी या मतदार संघातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास देखिल सुरुवात केली आहे.

मनसेने या मतदारसंघात अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी महापौर संजय मोरे हे इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदार संघात युती कोणाला रिंगणात उतरवणार यावर आघाडीचे गणित अवलंबून आहे. मनसेने या मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी देखिल त्यांचा उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत अटळ असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांचा आहे.