अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन

ठाणे: बहुचर्चित अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही कारवाई न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

नवीन एसआयटी पथकाचे प्रमुख मीरा-भाईंदर वसई-विरारचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे हे असणार आहेत. पथकात पिंपरी-चिंचवड येथील एक पोलीस उपायुक्त, एक सहाय्यक पोलीस आयुक्त, दोन वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश आहे. याशिवाय दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक आणि एक सहाय्यक उपनिरीक्षक यांचाही समावेश आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले.

शाळकरी मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नवीन विशेष तपास पथक स्थापन (एसआयटी) केले आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीआयडी पथकाकडून सर्व संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत आणि नव्याने तपास सुरू केला आहे, अशी पोलीस सूत्रांनी दिली.

बदलापूर येथील दोन शाळकरी चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदेवर होता. २३ सप्टेंबर रोजी तळोजा जेलमध्ये नेताना पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि हा एन्काऊंटर बनावट असल्याचा दावा केला. तर, सीआयडीने आदेश देऊनही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल न केल्याने, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सह पोलीस आयुक्त लख्मी गौतम यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडे करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना नवीन एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नवीन विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.