डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खबरदारी
ठाणे : शहरात डासांपासून होणाऱ्या आजारांनी जोर धरला आहे. वाढत्या बांधकामांमुळेच डास निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या आधीच स्पष्ट झाले आहे. या बांधकामांसाठी अटी-नियम जारी करण्यात आले असले तरी त्याची अंमलबजावणी नीट होत नसल्याने यापुढे नवीन बांधकाम सुरू करण्यासाठी शहर विकास विभागाबरोबरच आरोग्य विभागाची देखील परवानगी आवश्यक ठरणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक मोठी नवीन बांधकामे सुरू आहेत. यात अनेक मजल्यांच्या उंच इमारतींची बांधकामेही सुरू आहेत. अनेक मजली इमारतींचे बांधकाम करीत असताना, प्रत्येक मजल्याचे छत तयार झाल्यानंतर त्या पृष्ठभागावर पाणी साठवून ठेवले जाते. सिमेंट काँक्रीटचे छत असल्यामुळे छताला मजबुती येण्यासाठी सुमारे २१ दिवस छतावर पाणी साठवून ठेवले जाते. त्याचप्रमाणे इमारत बांधकामासाठी लागणारे पाणी मोठ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवले जाते. बांधकाम क्षेत्राच्या आजूबाजूला खोदलेल्या क्षेत्रात पाणी साठून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. अशा साचलेल्या पाण्यात अॅनोफिलीस व एडीस जातीच्या डासांची उत्पत्ती होत असून, यामुळे हिवताप आणि डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे वांरवार निदर्शनास आले आहे.
इमले उभारत असताना होणार्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेने नियम आणि अटी लागू केल्या आहेत. पण त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे आढळल्याने पालिका प्रशासनाने ठराव करून आरोग्य विभागाच्या परवानगीची सक्ती केली आहे. त्यानुसार नवीन बांधकामाचा प्रस्ताव शहर विकास विभागाकडे सादर केल्यानंतर आरोग्य विभागाकडे किटकजन्य आणि डास प्रतिबंधक उपाय करून घेणार असल्याची ‘हमी’ बांधकाम व्यवसायिकाला द्यावे लागणार आहे. वैद्यकीय अधिकार्याच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय शहर विकास विभागात बांधकामाची फाईल पुढे सरकणार नाही अशी तरतूद या ठरावात करण्यात आली आहे.
सुधारित नियमावलीप्रमाणे नवीन बांधकाम प्रस्ताव मंजूर करताना, कीटकजन्य साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवणे सक्तीचे करण्यात आले आहे. महापालिकेकडून नियुक्त कर्मचार्यांना बांधकाम ठिकाणच्या क्षेत्र तपासणीसाठी प्रवेश व सहाय्य करणे, बांधकामाच्या प्रतिचौरस मीटर क्षेत्रफळासाठी १.१३ प्रतिचौरस मीटरप्रमाणे प्रतिफवारणी सेवा शुल्क निश्चिती, फवारणी दरामध्ये क्षमतेप्रमाणे कमी-अधिक दरनिश्चितीला मंजुरी, डास आळीनाशक व धूर फवारणी आश्यकतेनुसार वर्षातून दोन वेळा करण्याचे निर्देश, इमारत बांधणीच्या वेळी फायलेरी विभागाच्या जीवशास्त्रज्ञांनी प्रामणित केलेल्या उपाय योजना राबवण्याचे निर्देेश देण्यात आले आहेत.
बांधकाम ठिकाणी पाणी साचून राहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. २१ दिवसांमध्ये डासांच्या तीन पिढ्या उदयास येतात. त्यामुळे बांधकामांवर पालिकेची करडी नजर आहे. आरोग्य विभागाकडून वारंवार अशा ठिकाणी पाहणी करून धूर फवारणी करण्यात येत आहे. त्यासाठी बांधकाम व्यवसायिकांकडून सेवा शुल्क आकारण्यात येत आहे. पण प्रतिबंधक हमी दिल्यानंतरही बांधकाम व्यवसायिकांकडून दुर्लक्ष झाल्यास दंडात्मक कारवाई सुद्धा होत आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी महेश बिरारी यांनी दिली.