नवी मुंबई : नवी मुंबई शहरात विना परवानगी होर्डिंग्ज लावल्यावर दखलपात्र गुन्हे दाखल केले जातात. मात्र जिवंत झाडांची कत्तल केल्यास दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे आदेश असून देखील अदखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे प्रकार उद्यान अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. त्यामुळे शासन आणि मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नवी मुंबई महानगर पालिका तसेच नवी मुंबईतील नागरिक झाडे वाचवण्यासाठी तसेच नवीन झाडे लावून त्यांची निगा राखण्यात अग्रेसर आहेत. मात्र याच जिवंत झाडांना औषध टाकून जाळण्याचा तसेच अवैध पद्धतीने झाडे तोडण्याचे सत्र शहरात सुरू आहे. या विरोधात मनपा उद्यान विभागात अनेक तक्रारी देण्यात आल्या आहेत. अवैध वृक्ष तोडी विरोधात दखल पात्र गुन्हा दाखल करण्याचे शासन आदेश आहेत. याबाबत तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील दखल पात्र गुन्हा दाखल करण्याबाबत मनपा उद्यान विभागाला आदेश दिले आहेत. मात्र असे आदेश असून देखील उद्यान अधिकाऱ्यांमार्फत अदखल पात्र गुन्हा दाखल करत शासन आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.त्यामुळे अशाप्रकारे कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवी मुंबई राष्ट्रावादी युवक कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांनी केली आहे.