मुंब्र्यातील दहावीच्या परिक्षार्थींची परीक्षा केंद्रे 5 किलोमीटर दूर! ॠता आव्हाड यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ठाणे: दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे घरापासून जवळ असावेत, असे संकेत आहेत. मात्र, मुंब्रा परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे घर आणि त्यांच्या शाळेपासून सुमारे पाच किमी अंतरावर देण्यात आले आहेत.

शहरातील वाहतूक कोंडीत जर विद्यार्थी अडकले तर त्यांना वेळेवर परीक्षा केंद्र गाठणे अशक्य ठरणार आहे. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे-पालघर विभागिय अध्यक्षा ऋता आव्हाड यांनी थेट जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनाच साकडे घातले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात शिक्षण विभागाशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

मुंब्रा भागातील दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनपासून चार ते पाच किमी अंतरावर असलेल्या कौसा, देवरी पाडा आदी भागात परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. राहत्या घरापासून सुमारे पाच किमी अंतरावर ही केंद्रे असल्याने विद्यार्थ्यांचा अधिकचा वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. या संदर्भात पटेल शाळेचे शिक्षक अब्दुल रेहमान आणि ईसराईल खान यांनी प्रशासनाशी अनेकवेळा संपर्क साधून केंद्र बदलण्याची विनंती केली होती. मात्र, त्यावर काहीही तोडगा निघत नव्हता. अखेर ही बाब ऋताताई आव्हाड यांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.