सिनियर वूमेन्स वने डे ट्रॉफीमध्ये मुंबईचा पंजाबवर ५ गडी राखून विजय

हुमैरा काझी आणि सायली सातघरे

मुंबईची कर्णधार हुमैरा काझीचे अर्धशतक आणि अष्टपैलू सायली सातघरेची उत्कृष्ट खेळी यांच्या मदतीने मुंबईने, सोमवारी, नवी दिल्लीतील सेंट स्टीफन मैदानावर पंजाबचा पाच गडी राखून पराभव केला.

सिनियर वूमेन्स वने डे ट्रॉफीचा सामना खेळताना, पंजाबने प्रथम फलंदाजी करत, सलामीवीर रिधिमा अग्रवाल (८५ चेंडूत ६९ धावा) आणि मधल्या फळीतील फलंदाज परवीन खान (१३३ चेंडूत नाबाद ९७ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकांत आठ विकेट्सच्या नुकसानाने २११ धावा केल्या. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स पटकावल्याने पंजाबला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईसाठी सातघरे सर्वात यशस्वी गोलंदाज होती. तिने नऊ षटकांत (ज्यात तीन मेडन्सचा समावेश होता) १९ धावा देऊन तीन गडी बाद केले. तिला सायमा ठाकोर (१/४७), जान्हवी काटे (१/४१), जाग्रवी पवार (२/२१), आणि सानिका चाळके (१/२०) यांची चांगली साथ लाभली.

प्रत्युत्तरात मुंबईने ४४.३ षटकांत पाच विकेट्स आणि ३३ चेंडू राखून लक्ष्य साध्य केले. जरी कोमलप्रीत कौरने चाळकेला (०) पहिल्याच चेंडूवर बाद करून मुंबईला मोठा झटका दिला असला तरी रिया चौधरी (५३ चेंडूत ३६ धावा) आणि वृषाली भगत (४० चेंडूत २३ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी करून डाव सांभाळला. ममता राणीने १३ व्या षटकात भगतला बाद करत ही भागीदारी तोडली. नंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या काझीने शानदार अर्धशतक (६१ चेंडूत ५६ धावा) झळकावले. त्याचबरोबर प्रकाशिका नाईक (३७ चेंडूत १९ धावा), सातघरे (४९ चेंडूत नाबाद ३९) आणि खुशी भाटिया (२६ चेंडूत नाबाद २६) यांनी फलंदाजीत उपयुक्त योगदान दिले.

या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळलेल्या मुंबईने दोन जिंकले असून एक पराभव पत्करला आहे. त्यांचा पुढील सामना बंगालविरुद्ध १० जानेवारी रोजी नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे होणार आहे