सिनियर वूमेन्स वन डे ट्रॉफीमध्ये रविवारी एअरफोर्स कॉम्प्लेक्स ग्राउंड, पालम II, नवी दिल्ली येथे, मुंबईने हैदराबादचा अवघ्या दोन धावांनी पराभव करून नॉक आऊट फेरीसाठी पात्र ठरले.
धुक्यामुळे उशीरा सुरु झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ३५ षटकात आठ बाद १८२ धावा केल्या. सलामीवीर रिया चौधरी (५७ चेंडूत ५० धावा) आणि कर्णधार हुमैरा काझी (५३ चेंडूत ५० धावा) यांनी दमदार अर्धशतके झळकावली. सायली सातघरेनेही ३८ चेंडूत ४२ धावांची उपयुक्त खेळी केली.
हैदराबादच्या बलाढ्य फलंदाजी विरुद्ध १८२ धावांचे रक्षण करताना, मुंबईने सामन्याच्या शेवटून दुसऱ्या चेंडूवर १८० धावांवर बाद करून नाट्यमय विजय मिळवला. जान्हवी काटेने तिच्या सात षटकात ३० धावा देऊन तीन गडी बाद केले आणि तिला जाग्रवी पवार (२/३५) आणि काझी (१/११) यांची चांगली साथ मिळाली. त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांनी चार धावबाद करून उत्कृष्ट कामगिरी केली.
मुंबई १६ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे उत्तराखंडविरुद्ध स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना खेळणार आहे.