मुंबईने बुधवारी बंगालचा 25 धावांनी पराभव करून सिनियर वूमेन्स वन डे ट्रॉफटीमध्ये त्यांचा तिसरा विजय नोंदविला.
नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव 50 षटकांत 200 धावांत आटोपला. सलामीवीर सानिका चाळकेने 142 चेंडूत 87 धावांची संयमी खेळी केली. चाळके चौकारांपेक्षा धावून रन्स काढण्यावर अधिक अवलंबून होती. तिच्या नावावर फक्त पाच चौकार होते. तिने 48 व्या षटकापर्यंत फलंदाजी केली आणि ती तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. मुंबईसाठी पुढची सर्वाधिक धावा करणारी आठव्या क्रमांकाची फलंदाज मनाली दक्षिणी हिने 56 चेंडूत 28 धावा केल्या.
बंगालच्या बलाढ्य फलंदाजी विरुद्ध 200 धावांचा बचाव करताना, मुंबईच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि त्यांनी 48.2 षटकात 175 धावांत गुंडाळले. जान्हवी काटे (2/26), जाग्रवी पवार (2/24), कर्णधार हुमैरा काझी (2/30) आणि वृषाली भगत (2/12) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पवारने मुंबईला पहिले यश 10व्या षटकात मिळवून दिले जेव्हा तिने धारा गुजर आणि सस्थी मोंडल यांच्यातील 44 धावांची सलामीची भागीदारी तोडली. मोंडल (120 चेंडूत 63 धावा) शिवाय बंगालचे इतर फलंदाज जास्ती योगदान देऊ शकले नाहीत.
या विजयानंतर मुंबई 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत (चार सामन्यानंतर). 14 जानेवारी रोजी एअरफोर्स कॉम्प्लेक्स ग्राउंड, पालम II, नवी दिल्ली येथे मुंबईचा स्पर्धेतील त्यांचा पाचवा सामना हैदराबादशी होईल.