मुंबईचा कचरा ठाणेकरांच्या घरात; धुळीचा थर साचतो अर्ध्या तासात

ठाणे : मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील दररोजची डेब्रिज आणि कच-याचा ढिगारा डंपरद्वारे भिवंडीला जातो. या डेब्रिजवर बऱ्याचदा आच्छादन नसल्याने त्याची धूळ उडून आनंदनगरमधील इमारतींवर आणि त्यातील घरांमध्ये बसते. दर अर्ध्या तासाने धुळीचे थर बसत असल्याने रहिवाशांच्या नाकी नऊ आले आहेत. एकूणच शहरात सर्वंकष स्वच्छता मोहीम जोरात सुरू असली तरी ठाण्याच्या वेशीवर मात्र तिचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा प्रकार गेले वर्षभर सुरु आहे. डंपरमधून धुळ आणि घाण तेथील परिसरात आणि रस्त्यांत पडत जात आहे. याचा त्रास जवळील सात इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांना सोसावा लागतो.

या सात-आठ इमारतींमधील रहिवाशांना २४ तास हवेत उडणा-या धुरळ्याला अक्षरक्ष: तोंड द्यावे लागते. घराच्या खिडक्या, दरवाजे बंद ठेवून दैनंदिन व्यवहार करावे लागत आहेत. खिडक्या, दरवाजे उघडल्यानंतर लगेचच ‘धुळ’, धुरळा घरांमध्ये घुसतो. तो वारंवार घराबाहेर काढण्यापेक्षा ‘तोंड दाबून’ शांत बसणेच शहाणपण आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.

मुंबई शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरातील भागात असलेल्या मानवी आरोग्याला अत्यंत धोकादायक आणि पर्यावरणासाठी हानिकारक असलेले डेब्रिज, माती, कचरा आणि रॅबिट दररोज कोपरी हद्दीत २४ तास येत असल्याने त्याच्या धुरळामुळे स्थानिक रहिवासी कमालीचे त्रासले आहेत. मुंबईची वेस ओलांडल्यानंतर विशेषत: काळोेख झाल्यावर डंपर्सची ये-जा सुरु होते. रोज सुमारे ६५ डंपर वाहनांची वाहतूक येथून होते. ठाणे पूर्व सर्व्हिस रोड आणि पूर्वद्रुतगती महामार्गांवरील वाहतुुकीकडे काटेकोरपणे लक्ष देणा-या वाहतूक पोलिसांनी या वाहनांना काही दिवसांपूर्वी सेवा रस्त्यावर येण्यासाठी मज्जाव केला होता. मात्र, तेरड्याचा रंग तीन दिवस या उक्ती प्रमाणे आणि ‘वरुन आलेल्या’ आदेशां’चे पालन डंपर चालकांनी काही दिवस काटेकोरपणे केले. त्यानंतर मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या यानुसार नियमावली पायदळी तुडवून वाहतूक सुरू झाली.

ठाणे वाहतूक पोलिसांनी कोपरी हद्दीत येणा-या ब-याच डंपरना अटकाव केल्यानंतर डंपरचालक मुंबई महापालिकेने दिलेल्या परवान्याच्या आधारे बिन-दिक्कत बारा बंगलामार्गे जात आहेत. डेब्रिज माती कचरा आणि रॅबिट घेऊन येणारे डंपर सकाळी, दुपारी व सायंकाळी, रात्री मुंबईच्या विविध भागांमधून ठाण्याच्या दिशेने येतात. ठाणे वाहतूक पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यावर ते मुंबई महापालिकेने दिलेल्या परवानाच्या आधारे कोपरी गावमार्गे भिवंडीकडे जातात, अशी माहिती ठाणे वाहतूक पोलिसांमधील सूत्रांनी दिली