अनधिकृत बांधकाम प्रकरणी एमआरटीपीचे गुन्हे दाखल

केवळ कागदी घोडे नको, प्रत्यक्ष कारवाई करा-आमदार संजय केळकर

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये बेकायदा बांधकामांची उभारणी केल्याप्रकरणी अतिक्रमण विभागाने संबंधित भुमाफियांवर सेक्शन – ५२ नुसार एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. पण, केवळ कागदी घोडे नको तर या भुमाफियांनी उभारलेली अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून शहराला लागलेली ही किड समुळ नष्ट करावी, अशी मागणी आ. संजय केळकर यांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोना काळात ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती. शहरातील घोडबंदर, राबोडी, कळवा, विटावा, दिवा, मुंब्रा, शिळफाटा आदी भागात भूमाफियांकडून राजरोसपणे बेकायदा बांधकामे केली जात आहेत. या बांधकामांच्या विरोधात मागील सहा महिन्यांपासुन आ. संजय केळकर लढा देत आहेत. पालिका प्रशासनाला बेकायदा बांधकामांची छायाचित्रे आणि बांधकामे सुरु असलेल्या ठिकाणांची यादी दिली होती. आ. केळकर यांनी शहरातील बेकायदा बांधकामाचा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनातही उपस्थित केला होता. त्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र काही दिवसातच ही मोहिम थंडावल्याने भूमाफिया पुन्हा सक्रिय झाले होते. दरम्यान, महापालिकेने आता भुमाफियांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून राबोडीतील बेकायदा बांधकाम प्रकरणी सेक्शन ५२ अंतर्गत एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले आहेत.

महापालिकेच्या कारवाईचे स्वागत मात्र, केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही तर, त्यांनी उभारलेली बांधकामेही अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त करावीत. ज्या भागात ही बांधकामे सुरु आहेत, तेथील सहाय्यक आयुक्तांना निलंबित करून बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. भूमाफियांवर केवळ दंडात्मक कारवाई करून चालणार नाही. ही शहराला लागलेली कीड समुळ नष्ट करा. अनेकदा अशी बांधकामे वाचविण्यासाठी नागरिकांना त्याठिकाणी आणले जाते. नागरिक रहायला आल्यामुळे मानवतेच्या भूमिकेतून कारवाई करता येत नाही म्हणूनच अशा बांधकामांचे पेव फुटले आहे. त्यामुळे अशा बांधकामांमध्ये नागरिक रहायला येण्याआधी कारवाई करावी, अशी मागणी श्री.केळकर यांनी केली आहे.

विटावा, कोलशेत, दिवा भागात प्रशासन निद्रिस्त?

विटाव्यात जुन्या इमारतीवर तीन ते चार मजले उभे राहिले. इमारत बांधकामांची यादी कळवा प्रभागाच्या सहायक आयुक्तांना देण्यात आली, मात्र एक दिवस वर वर हातोडा मारून कारवाईची छायाचित्रे काढण्यात आली. काही इमारतींवर कारवाईच करण्यात आली नाही. भूमाफियांना पाठीशी घातले जात असल्याचे यावरून उघडकीस आले. दिव्यात तर जागोजागी बेकायदा बांधकामे सुरू आहेत तर कोलशेत वरचा गाव येथे सुरू असलेल्या बेकायदा इमारतीकडे दुर्लक्ष होत आहे. एकूणच या ठिकाणी कारवाईबाबत प्रशासन निष्क्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे