खा.श्रीकांत शिंदे यांना कल्याण ग्रामीणमधून रसद तर मुंब्र्यात फटका

वैशाली दरेकर यांना मुंब्र्यातून रसद

कल्याण : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचा दोन लाख 9144 मतांनी विजय झाला. या लोकसभा निवडणुकीची विधानसभानिहाय आकडेवारी आता समोर आली असून डॉ. शिंदे यांना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मते तर कळवा मुंब्रा विधानसभा मतदार संघात कमी मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांना कळवा मुंब्रा विधानसभेत सर्वात जास्त मते प्राप्त झाली आहेत.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. त्यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर होणाऱ्या या देशाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तिसऱ्यांदा दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. या विजयामध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघाने डॉ. शिंदे यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. तर त्याखालोखाल डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि मग कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक लागत आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांना कल्याण ग्रामीण विधानसभेत एक लाख 51,702 मते, डोंबिवली विधानसभेत 99,734 मते, अंबरनाथ विधानसभेत 93,670 मते, कल्याण पूर्व विधानसभेत 87,129 मते, उल्हासनगर विधानसभेत 85,698 मते, तर मुंब्रा-कळवा विधानसभेत 69,988 मते मिळाली आहेत.

महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांना कळवा मुंब्रा विधानसभेत सर्वाधिक जास्त एक लाख 35,496 मते मिळाली आहेत. त्यापाठोपाठ कल्याण ग्रामीण विधानसभेत 65,407 मते, अंबरनाथ विधानसभेत 58028 मते, कल्याण पूर्व विधानसभेत 54,533 मते, डोंबिवली विधानसभेत 34,531 मते तर उल्हासनगर विधानसभेत 31,241 मते मिळाली आहेत.

टपाली मतदान देखील निर्णायक ठरले असून डॉ. श्रीकांत शिंदे यांना 1,715 तर वैशाली दरकेर यांना 1,256 मते मिळाली आहेत. वरील पैकी कोणीही नाही म्हणजेच नोटा ला 11,686 मतदारांनी मतदान केले आहे.

दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत डॉ. श्रीकांत शिंदे यांना 29,313 मते जास्त मिळाली असून त्यांचे मताधिक्य मात्र एक लाख 35,199 मतांनी घटले आहे. 2019 च्या निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाच लाख 59,723 मते मिळाली होती. तर तेव्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या विरोधात एक लाख 35,199 मतांचे मताधिक्य मिळाले होते.