ठाणे जिल्ह्यात शिवसेना बांधणीचीही मिळणार जबाबदारी?
ठाणे : शिवसेनेतून खासदार भावना गवळी यांची हकालपट्टी करण्यात आल्याने लोकसभेच्या मुख्य प्रतोदपदी खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे श्री. विचारे यांच्यावर ठाणे जिल्ह्यात नव्याने संघटनेची बांधणी करण्याची जबाबदारीही मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याबाबतचे पत्र शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी नुकतेच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह वेगळा गट करून भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून शिवसेना सावरत नाही तोच खा. शेवाळे यांनी दिलेल्या पत्राने शिवसेनेच्या १८ खासदारांच्या भूमिकेबाबतही उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. खा. भावना गवळी या एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने या चर्चेला अधिक पुष्टी मिळू लागली आहे.
शिवसेनेचे मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून श्रीमती द्रोपदी मुर्मू यांना मतदान करण्याची अनुमती द्यावी असे सुचवले आहे. परंतु महाविकास आघाडीच्या अन्य दोन घटक पक्षांची साथ विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना असल्यामुळे शिवसेना त्यांनाच पाठिंबा देईल अशी अटकळ आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विचारे यांनी व्हिप बजावला तर मुर्मू यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
राज्याप्रमाणे केंद्रातही शिवसेनेला धक्का बसू नये म्हणून शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. लोकसभेतील शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र देत खा. भावना गवळी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या जागी मुख्य प्रतोद म्हणून खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी पक्षातून एक्झिट घेतल्यावर ठाणे जिल्ह्यात कोण नेतृत्व करणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. माजी महापौर असलेले राजन विचारे दोनदा आमदार म्हणून निवडून आल्यावर खासदारकीची दुसरी टर्म उपभोगत आहेत. त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन पक्ष त्यांच्यावर जबाबदारी टाकणार हे स्पष्ट होते. त्याचे संकेत आजच्या नेमणुकीमुळे मिळाले आहेत.