आयुक्तांचा वेळ मिळत नसल्याने अधिकाऱ्यांचा खोळंबा
ठाणे : प्रस्तावांवर तयार करण्यात आलेल्या फाईलींवर चर्चाच होत नसल्याने ठाणे महापालिकेतील विविध विभागातील तब्बल ७०० पेक्षा अधिक फाईल्स पुढे सरकलेल्या नाहीत. या फाईलींवर चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्त वेळ देत नसल्याने महापालिका अधिकाऱ्यांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला आहे.
फाईलींवर चर्चा होणारच नसेल तर विविध विभागांकडून तयार करण्यात आलेले प्रस्ताव मार्गी लागणार कसे असा प्रश्न महापालिकेतील अधिकाऱ्यांना आणि विभाग प्रमुखांना पडला आहे. शहरातील स्वच्छता आणि सुशोभीकरणाला प्राधान्य देणाऱ्या ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यामुळे ठाण्यात अपेक्षित बदल दिसून येत असले तरी महापालिकेच्या इतर कामात मात्र तसा वेग येताना दिसत नाही. ठाणे महापालिकेत वेगवेगळे ३५ पेक्षा अधिक विभाग असून या विभागांच्या अंतर्गत विविध प्रकारचे प्रस्ताव तयार करण्यात येतात. या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच पुढची कार्यवाही होण्यासाठी महापालिका आयुक्तांशी चर्चा होणे आवश्यक असून त्यानंतरच या फाईल्सचा मार्ग मोकळा होतो. मात्र संबंधित फाईलवर चर्चा होत नसल्याने त्यामुळे फाईल पुढेही सरकत नाही. फाईलवर संक्षिप्त नोट करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर एक ते दोन महिने फाईलवर चर्चा होत नसल्याने हे प्रस्ताव देखील पुढे सरकत नाहीत.
नागरिकांच्या कामांना प्राधान्य देण्यासोबत त्यांची कामे वेळेत पूर्ण करा अशा सक्त सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यासाठीही आयुक्त दररोज वेळ देत आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या प्रस्तावांच्या फाईलवरच चर्चा करण्यासाठी वेळ देत नसल्याने अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.