५०हून जास्त घरफोड्या; सराईत चोर जेरबंद

ठाणे: ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी तब्बल ८० पेक्षा अधिक घरफोड्या करणारा सराईत चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागला आहे. गुन्हे शाखा घटक ३ कल्याणकडून या चोरट्याला जेरबंद करण्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात या सराईत चोरट्यावर गुन्हे दाखल आहेत.

लक्ष्मण शिवशरण (४७) असे जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहणारा आहे. सध्या तो काल्हेर या ठिकाणी वास्तव्यास होता. लक्ष्मण याच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक ३ कल्याणकडून करण्यात येत असतांना परिसरात असलेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने चोरी केलेले सोन्याचे दागीने मिरारोड येथील सुकेश कोटीयन (५५) याच्याकडे विक्रीकरिता दिले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने कोटियन याला देखील अटक करण्यात आली आहे.

लक्ष्मण याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ५० घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून घरफोडी करून चोरी केलेल्या गुन्हयातील ५३ लाख ४१,२८० रूपये किमतीचे ६६७ ग्रॅम, ६६० मी.लि. वजनाचे सोन्याचे दागिने आणि ७८,९०० रूपये रोख असा एकुण ५४ लाख २०,१८० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर ५० घरफोडीचे गुन्हे देखील यामधून उघड झाले आहे. चोरी करण्यापूर्वी तो घराची रेकी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.