ऑर्गन गॅसच्या टंचाईमुळे फॅब्रिकेशन उद्योगांवर परिणाम
ठाणे : फॅब्रिकेशन इंडस्ट्रीजद्वारे वापरल्या जाणाऱ्या ऑर्गन गॅसच्या टंचाईमुळे ठाणे आणि नवी मुंबईमधील १५०० पेक्षा अधिक उद्योग अडचणीत आले आहेत. ऑर्गन गॅस मुख्यत्वे करून स्टेनलेस स्टीलच्या फॅब्रिकेशन युनिट्ससाठी वापरला जात असून या गॅसचा पुरवठाच होत नसल्याने फॅब्रिकेशन उद्योगांवर याचे परिणाम जाणवू लागले आहे. दुसरीकडे ऑर्गन गॅसची ही कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली असल्याचा आरोप मात्र या क्षेत्रातील उद्योजकांकडून केला जात आहे.
फॅब्रिकेशन इंडस्ट्रीजद्वारे वापरल्या जाणाऱ्या ऑर्गन गॅसच्या पुरवठ्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने उद्योजकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ऑर्गन गॅस मुख्यत्वे करून स्टेनलेस स्टीलच्या फॅब्रिकेशन युनिट्ससाठी उपयोगी आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातीलच उद्योगांवर या टंचाईचा परिणाम झाला आहे. ठाणे-नवी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये फॅब्रिकेशन इंडस्ट्रीची संख्या ही १५०० च्या वर आहे. जर ऑर्गन गॅसचा पुरवठा झाला नाही तर यापुढे उद्योग सुरु ठेवणे कठीण असल्याचे या क्षेत्रातील उद्योजकांचे म्हणणे आहे. ठाणे लघु उद्योजक संघटनेने सुद्धा याची दखल घेतली असून ही टंचाई निर्माण होण्यामागच्या कारणांचा शोध लघु उद्योजक संघटनेकडून घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान ऑर्गन गॅसची निर्माण झालेली टंचाई ही नैसर्गिक नसून कृत्रिम टंचाई असल्याचे काही उद्योजकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या कृत्रिम टंचाईमुळे सुमारे १५०० पेक्षा जास्त फॅब्रिकेशन उद्योग बंद करावे लागतील, अशी भीती उद्योजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
किमंतीवरही नियंत्रण नाही
या क्षेत्रातील उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी ऑर्गन गॅसच्या सिलेंडरचे दर 800 ते 1000 रुपये होते. मात्र आता तोच दर सुमारे सहा हजारावर गेला आहे. 2 ते 3 महिन्यांनी ही दरवाढ होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीजला लागणाऱ्या सिलेंडरच्या किमतीवरही कोणत्या प्रकारचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमित गॅसचा पुरवठा होत नसल्याने आलेल्या कामाच्या ऑर्डर रद्द होत असल्याने परिणामी उद्योग अडचणीत सापडले आहेत.
स्टील फॅब्रिकेशन म्हणजे काय?
सर्जिकल उपकरणे आणि हायपोडर्मिक सुया, कटलरी आणि किचनवेअर, हॅन्डरेल्स आणि काउंटरटॉप्स, रेफ्रिजरेटर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन इत्यादी बनवण्यासाठी स्टेनलेस स्टील फॅब्रिकेशनचा वापर केला जातो. स्टील मेटल फॅब्रिकेशन तंत्रासाठी विशेष कौशल्ये, प्रशिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे आणि तज्ञांद्वारे केले जाते. हे सर्व करण्यासाठी ऑर्गन गॅसचा वापर केला जातो.