आई मला पाळी का येते ग ?

सांग ना ,मला दुखत ग खूप, मला घाण पण वाटते, आई सांग ना मला नको ही पाळी. हुंदका देत देत नुकतीच वयात आलेल्या तन्वीने आईकडे आपलं दुःख मांडल. असे अनुभव बहुतांश आयांनी अनुभवले असतील. आता वयात आलेल्या मुलीला कसं सांगायचं वैद्यकीय आणि निसर्गक्रिया. मग आई म्हणाली, चल आपण डॉ. ज्योती साईगांवकर यांच्याकडे जाऊया…!
तन्वीच्या आईची डिलिव्हरी मीच केल्यामुळे तन्वी मला नेहमी भेटायला येई. गोड गोड पापा देई, माझ्याबरोबर फोटो काढी, तिला माझ्यासारखे स्त्रीरोग तज्ञ व्हायचे होते. माझ्या केबिनमध्ये केविलवाण्या चेहऱ्याने ती बसली होती. ती आताच सातवीत गेली होती आणि वयाच्या अकराव्या वर्षीच पाळी आली. मी म्हटलं, बाळा ऐक आणि आई तू पण ऐक ! प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलं वयात येत असताना त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक बदल होत असलेल्या क्रिया त्यांना वैद्यकीयदृष्टीने समजावून सांगता आल्या पाहिजेत. पुढे जाऊन शाळेत विज्ञान शास्त्रात प्रजनन प्रणाली (Reproductive system) वर एक पूर्ण धडा आहे. शाळेत आम्ही डॉक्टर आणि शिक्षक ह्याबद्दल योग्य ज्ञान आणि मार्गदर्शन करतो. पण त्या आधी आईने मुलीला सोप्या शब्दात समजावणं गरजेचं आहे.
पाळी (menses) अतिशय सुंदर अशी नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. प्रजननासाठी म्हणजे बाळ होण्यासाठी रिप्रोडक्शन ही अतिशय महत्त्वाची क्रिया आहे. जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या शरीरात एक गर्भाशय (Uterus ), दोन अंडनलिका (Fallopian tube), दोन अंडाशय (Ovary ) आणि एक योनी (Vagina ) असते. मेंदूमध्ये असलेले संप्रेरक (Hormones) वयात आल्यावर ऍक्टिव्ह होतात. दोन प्रमुख संप्रेरक  (FSH & LH) हे मेंदूमध्ये असलेल्या Pitutary gland मधून रक्तात मिसळतात आणि अंडाशयावर क्रिया करतात. अंडाशय दोन मुख्य संप्रेरक तयार करतात. (Estrogen & Progesterone ). जन्माच्या वेळी अंडाशयामध्ये १-२ मिलियन अंडी असतात. वयात आल्यावर फक्त 25 टक्के अंडी राहतात, ३ लाख अंदाजे. दर महिन्याला एक अंड तयार होते आणि पाळीचे १४-१६ व्या दिवशी फुटते त्या क्रियेला Ovulation असे म्हणतात. यादरम्यान पती-पत्नीचे शारीरिक संबंध आले तर गर्भधारणा होते नाहीतर महिना अखेरीस पाळी येते. पाळी म्हणजे देवाने तयार केलेल्या गर्भाशयाचा आतल्या आवरणाचा बिछाना, जो पाळी आल्यावर रक्ताच्या रुपात वाहून जातो आणि परत नव्याने अंड बनवायच्या तयारीला शरीर रुजू होते.
पाळी येण्याआधी शरीरात संप्रेरकांच्या परिणामामुळे काही बदल होतात. उदा. बगलेत आणि योनीच्या बाहेर केस येणे. स्तनांची वाढ होणे, आवाज बदलणे, चिकट सफेद स्त्राव जाणे. हे सगळे बदल सकारात्मक आहेत. हे प्रत्येक आईने मुलीला सांगितले पाहिजे. मनमोकळेपणाने तिच्याशी बोलले पाहिजे.
पाळीमध्ये दुखणे ही सामान्य गोष्ट आहे आणि हे दुखणे गरम पाण्याच्या पिशवीने शेकून कमी करता येते. मुलीच्या डाएटमध्ये लोह वाढवणारे स्तव ,प्रोटीन आणि हेल्दी fats असावेत. योगा आणि व्यायाम तसेच ॲक्टिव राहून तिचे शरीर लवचिक असेल तर तिला कमी त्रास होईल.
पाळीत disposable pad चा वापर करून दर ६-८ तासाला बदलणे गरजेचे आहे. पाणी आणि माईल्ड सोपने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. अति रक्तस्त्राव खूप दिवस चालू आहेत आणि खूप दुखत असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Reproductive system ला पूर्ण तयार होऊ द्यावे आणि २२-२५ वयानंतरच मुलीचे लग्न करावे.
आजच्या युगात स्त्रिया सर्व क्षेत्रात पुढे आहेत आणि पाळी ही सुंदर क्रिया त्यांना आई व्हायचे सुख देते. ही क्रिया आल्यावर वाढदिवसासारखे साजरे करावे. आणि आपल्या मुलीचा आत्मविश्वास वाढवावा.
– डॉ. ज्योति साईगांवकर
एम डी ,डी जी ओ ,डी एन बी
वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ
डॉ. साईगांवकर हॉस्पिटल
वर्तक नगर ठाणे
७३०३९६०२१२ / ८६५२१२५९४७