मोदी यांची हॅटट्रिक होणार; नितीश-चंद्राबाबुंसह घटक पक्षांचा पाठिंबा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही, पण मित्रपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींनाही वेग आला आहे. दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना संसदीय दलाचा नेता म्हणून निवडण्यात आले.

या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपला समर्थनाची पत्रे दिली आहेत. म्हणजेच, नितीश आणि चंद्राबाबू यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. तसेच, लोकसभा भंग करण्याची विनंती केली. यानंतर सायंकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एनडीएची तासाभरात बैठक झाली. या बैठकीत नितीश आणि चंद्राबाबू यांच्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पवन कल्याण, जयंत चौधरी, जीतन राम माझी, चिराग पासवान, अनुप्रिया पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्लपटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा जादुई आकडा पार करता आला नाही. त्यामुळेच आता त्यांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. विशेष म्हणजे, जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे एन चंद्राबाबू नायडू एनडीए सरकार स्थापन करण्यात किंगमेकरची भूमिका बजावत आहेत. या निवडणुकीत भाजपने 240 जागा जिंकल्या, ज्या बहुमताच्या आकड्यापेक्षा 32 ने कमी आहे. तर, टीडीपी आणि जेडीयूकडे एकूण 28 जागा आहेत. भाजपच्या इतर मित्रपक्षांसोबत मिळून एनडीए बहुमताचा आकडा पार करेल.

या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी देखील नरेंद्र मोदी यांना समर्थन असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर पोस्ट करताना शिंदेंनी लिहिले की, ‘लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदीजी यांचे या विजयाबद्दल अभिनंदन करून त्यांना पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड, चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम प्रमाणेच शिवसेनेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी तयार असल्याचे सांगत जाहीर पाठींबा दिला,’ असे ते म्हणाले.

नितीश कुमारांनी पलटी मारली तर… 

काँग्रेस गेल्या 10 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. यामुळे आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवून कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल. अशा एकूण परिस्थितीत, सर्वांच्याच नजरा नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे लागल्या आहेत.

नितीश कुमार यापूर्वीही अनेक वेळा इकडून-तिकडे गेले आहेत. बुधवारी सकाळी पाटण्याहून दिल्लीला पोहोचलेल्या विस्ताराच्या फ्लाइटमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव पुढे-मागे बसलेले दिसले, हाही चर्चेचा विषय ठरला. यामुळे आता सर्वांचीच नजर जागांच्या समीकरणावर आहे. नितीश कुमार एनडीएमधून पुन्हा इंडिया आघाडीसोबत गेले तर मोदी सरकारचे काय होईल? अशा चर्चाही होताना दिसत आहेत. या निवडणुकीत एकूण 12 जागा मिळाल्याने नितीश कुमार यांचे महत्व अधिक वाढले आहे. मात्र, नितीश कुमार यांनी पलटी मारली आणि ते इंडिया आघाडीसोबत गेले, तरीही इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या 272 जागांपर्यंत पोहोचत नाही.

नितीश यांच्या जाण्याने भाजपला नक्कीच धक्का बसेल. मात्र, इतर अनेक मित्रपक्षांच्या मदतीने ते सत्तेवर येऊ शकतात. भाजपला एकूण 240 जागा मिळाल्या आहेत. तर चंद्राबाबू नायडूंना 16 जागा मिळाल्या आहेत. या दोहोंची बेरीज केल्यास, आकडा 256 वर जातो. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेही सात खासदार आहेत. अशा प्रकारे संख्या 263 होते. स्वत:ला मोदींचे हनुमान म्हणवून घेणाऱ्या चिराग पासवान यांच्याकडेही पाच खासदार आहेत. यासह आकडा 268 वर पोहोचतो. तसेच, आंध्रच्या जनसेनेला दोन, जयंत चौधरी यांच्या आरएलडीला दोन, अपना दल आणि अजित पवार यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. यांसह हा आकडा 274 वर पोहोचतो. हा आकडा सरकार स्थापनेसाठी लागणाऱ्या मॅजिक फिगरपेक्षाही दोनने अधिक आहे.

याशिवाय, पंजाबमध्ये भाजपचा सहकारी पक्ष राहिलेल्या अकाली दलानेही एक जागा जिंकली आहे. भाजपने प्रयत्न केल्यास त्यांची साथ मिळू शकते. जीतनराम मांझी यांचा पक्ष एचएएम आणि आसाममधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेनेही एक जागा जिंकली आहे. या सर्वांचे सहकार्य मिळाल्यास एनडीएचा एकूण आकडा 277 वर पोहोचतो.