मनसेचे महेश कदम यांचा भाजपामध्ये प्रवेश

ठाणे: मनसेचे ठाणे शहरातील माजी विभाग अध्यक्ष महेश कदम व भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख नितीन वाघमारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये आज प्रवेश केला. भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपाचे आमदार संजय केळकर आणि जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे हे यावेळी उपस्थित होते.

मनसेबरोबरच महेश कदम यांनी स्वामी फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य केले आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच श्री. कदम यांनी २०१७ मधील महापालिकेची निवडणूकही लढविली होती. तर भीम आर्मीचे जिल्हाप्रमुख नितीन वाघमारे यांनाही मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. या दोघांबरोबरच शेकडो कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाची संघटनात्मक फळी आणखी मजबूत झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या काही तासांपूर्वी माझा भाजपात प्रवेश होत आहे. याबद्दल मी भाग्यवान आहे. सध्याच्या परिस्थितीत हिंदूत्वाचा केंद्रबिंदू हा भाजपाच आहे. ते लक्षात घेऊन भाजपामध्ये सहभागी झालो, अशी प्रतिक्रिया महेश कदम यांनी व्यक्त केली.

यावेळी महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, भाजपाचे प्रदेश सचिव संदीप लेले, माजी नगरसेवक सुनेश जोशी, ठाणे परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, भाजपाचे शहर सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे आदी उपस्थित होते.