पदवीधर निवडणुकीत मनसे विरुद्ध भाजपात सामना

विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि पानसे यांच्यात होणार लढत?

ठाणे : राज्यातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने पुन्हा विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना रणांगणात उतरवले आहे तर त्यांना लढत देण्यासाठी मनसेने अभिजित पानसे यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध मनसेचे अभिजित पानसे या लढतीमुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. अभिजित पानसे हे मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांच्या उमेदवारीमुळं मनसेला या मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे दोन वेळा निवडून आले आहेत. 26 जून रोजी ही निवडणूक होणार असून, त्यासाठी आधीच मतदार नोंदणी झालेली आहे.
या निवडणुकीत मनसे आणि भाजपामध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. अभिजित पानसे यांच्या उमेदवारीमुळं मनसेच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण मागील अनेक दिवसांपासून मनसेकडून लढवली जाणारी ही पहिलीच निवडणूक आहे. तर निरंजन डावखरे यांना भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ लाभल्यामुळे तेही आत्मविश्वासानं मैदानात उतरले आहेत. मतदारसंघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.