एमएमआरडीए बदलापूरमधील अनुशेष भरून काढणार – फडणविस

शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शानदार लोकार्पण

बदलापूर: बदलापूरमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून निधीची त्वरित पूर्तता केली जाईल आणि प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लावल्या जातील. तसेच विकासकामांचा अनुशेष भरून काढला जाईल असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आमदार किसन कथोरे हे आगामी काळात मंत्री नक्की होतील, असा विश्वास व्यक्त केला.

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शानदार लोकार्पण आज मुख्यमंत्री फडणविस यांच्या हस्ते बदलापूरमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते.

नागरिकांना त्रासदायक ठरलेल्या निळी आणि लाल पूर रेषेबाबत नव्या नियमावलीप्रमाणे कार्यवाही करून त्यातून मार्ग काढला जाईल. उल्हास नदीचे खोरे देखील मोठे विस्तीर्ण आहे, त्यावर भविष्यात धरणे बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, त्यामुळे पूररेषेची समस्या काही प्रमाणत सुटू शकेल, त्यातील गाळ काढला जाईल, मात्र नदीमध्ये अशुद्ध येणारे पाणी थांबवावे लागेल त्यासाठी उपाययोजना करावी लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणविस यांनी केले. बदलापूरच्या मेट्रोचे कामही हाती घेण्यात येईल, पाणी पुरवठ्याच्या योजनेकडेही लक्ष देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले.

राज्यात लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर भाजपातर्फे लाडक्या बहिणींतर्फे मुख्यमंत्री फडणविस यांचा सन्मान करण्यात आला. प्रथमच बदलापूरला बहिणींकडून सन्मान केला गेला याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

एमएमआरडीएकडून सापत्न वागणूक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शामुळे पावन झालेल्या बदलापूरला शिवकालीन बदलापूर असा दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार कथोरे यांनी केली. पाच वेळा आमदार झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. उल्हास नदीमधील गाळ अनेक वर्षे काढला नाही, नदी संवर्धनाची गरज आहे, बदलापूरचा एमएमआरडीएमध्ये समावेश असूनही एमएमआरडीएकडून सापत्न वागणूक मिळत असल्याबद्दल आमदार कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली. एमएमआरडीएकडून झालेला अन्याय दूर करावा, असे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनाला आणून दिले. बदलापूरपर्यंत मेट्रो सुरु होण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न झाले पण त्याला यश आले नाही मेट्रोच्या कामाला लागलेला ब्रेक काढावा असेही आमदार कथोरे यांनी सूचित केले.

मुरबाडमधून सतत पाचवेळा आमदार झालेल्या किसन कथोरे यांना मंत्रिपद मिळू शकले नाही, एमएमआरडीए क्षेत्रांत असतानाही निधीची कमतरता आहे, बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका करावी, पालिकेत भाजपची एक हाती सत्ता येईल, असा दावा माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी केला.

खासदार सुरेश म्हात्रे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार कुमार आयलानी, प्रमोद हिंदुराव, माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर, शहराध्यक्ष शरद तेली, संभाजी शिंदे, यांनी सूत्रसंचलन केले. संजय भोईर यांनी आभार मानले.