आमदार संजय केळकर यांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती
ठाणे महापालिकेतील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची आज बैठक घेत आमदार संजय केळकर यांनी चर्चा करून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. यात टीडीआरएफ, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षक, विविध वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश होता. यावेळी प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
आमदार संजय केळकर यांनी आज ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, आस्थापना उपायुक्त श्री.गोदापुरे, वैद्यकीय अधिकारी उमेश बिरारी आणि अन्य विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. याबाबतची माहिती पत्रकारांना देताना श्री.केळकर म्हणाले, जो घाणीत काम करतो, तो सफाई कामगार अशी आमची भूमिका आहे. सफाई कामगारांच्या अनुकंपा वारसा हक्क प्रकरणी ८ जानेवारीला न्यायालयात प्रकरण असून लाड-पागे समितीने दिलेल्या शिफारसी स्विकारल्या जातील, असा विश्वास श्री.केळकर यांनी व्यक्त केला. शिक्षण विभागात ठोक पगारावर अनेक शिक्षक १० ते १५ वर्षे काम करत असून त्यांना अद्याप नियमित करण्यात आलेले नाही. त्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवून मान्यता घेण्यात येणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.
महापालिकेत दर महिन्याला अनेक कामगार निवृत्त होत असून सध्या सुमारे ४ ते ५ हजार कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. एक कर्मचारी चार चार कर्मचाऱ्यांचे काम करत असून काही अधिकाऱ्यांकडे एकाहून जास्त जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची महाभरती करण्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. लवकरच याबाबतचा निर्णय होऊन कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील परिचारिकांच्या अनेक तक्रारी असून अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. येत्या ७ तारखेला याबाबत बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री.केळकर म्हणाले. एएनएम कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्रुटी असून इतर महापालिकांच्या धर्तीवर ठामपातही वेतन देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिकेतील ड वर्ग कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडली असून त्याबाबतचाही निर्णय झाला आहे. यात सहायक सुरक्षा अधिकारी पदासाठी. महिलांना प्राधान्य देण्याबाबतही विचार होणे आहे. सुरक्षा रक्षक महिलांच्या सतत बदल्या होत असल्याने त्यांची ससेहोलपट होत आहे. हा निर्णय स्थगित करण्यात आला असून महिन्याभरात याबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.
याबरोबरच सातवा वेतन आयोगातील फरक, वाहतूक भत्ता, एम. ए. झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, आश्र्वासित प्रगती योजना आदींबाबतही निर्णय झाल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांना दिली.